अब्दुल सत्तार दिल्लीत तळ ठोकून, मंत्रिपदासाठी सत्तारांची लॉबिंग?

मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये बढती सोडा, आहे ते राज्यमंत्रिपद तरी टिकणार का, याची धाकधूक सत्तारांना असल्याची चर्चा आहे.

Abdul Sattar

शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. शिंदे फडणवीस यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ यादीतून सत्तारांचे नाव वगळल्याची चर्चा आहे. याची कुणकुण लागल्यामुळे अब्दुल सत्तार दिल्लीत तळ ठोकून असल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला महिना होत आला आहे. मात्र, अद्याप शिंदे फडणवीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे बोलले जात आहे.

भाजपश्रेष्ठींकडे लॉबिंग –

मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असल्याचे बोलले जात आहे. सत्तार शिंदे गटाचे आमदार आहेत. शिंदे गटाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रिपदे येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये बढती सोडा, आहे ते राज्यमंत्रिपद तरी टिकणार का, याची धाकधूक सत्तारांना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी दिल्ली गाठून भाजपश्रेष्ठींकडे लॉबिंग केल्याचे बोलले जात आहे.

3 ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार –

दिल्लीला जाण्यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली अंतिम टप्प्यात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३ ऑगस्टपूर्वी संपन्न होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत. कोणते जिल्हे ते (भाजप) घेतील कोणते जिल्हे आम्हाला मिळणार. त्यांचे किती मंत्री असतील, आमचे किती मंत्री मंत्री होणार?, याबाबत चर्चा केली जात आहे. मला असं वाटत पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय होईल आणि ३ तारखेच्या आत शपथविधी होईल, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.