नवी दिल्ली : भारताने आणि भारताच्या चंद्रयानाने 23 ऑगस्टला हे सिद्ध केले आहे की, संकल्पाचे काही सूर्य चंद्रावरही उगवत असतात. ही मोहीम म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हायचेच, या भारताच्या प्रवृत्तीचे प्रतीक बनले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा – सध्या देशात फसवाफसवीचे बुद्धिबळ जोरदार सुरू, संजय राऊत यांचा मोदी सरकारवर निशाणा
‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी आपल्या चांद्रयान-3 मोहिमेची प्रशंसा करताना त्यांनी एक कविता वाचून दाखविली –
आसमान में सर उठाकर, घने बादलों को चीरकर
रोशनी का संकल्प ले, अभी तो सूरज उगा है।
दृढ निश्चय के साथ चलकर, हर मुश्किल को पार कर
घोर अंधेरे को मिटाने, अभी तो सूरज उगा है।
आसमान में सर उठाकर, घने बादलों को चीरकर
अभी तो सूरज उगा है…
जेथे महिला शक्तीचे सामर्थ्य जोडले जाते. तेथे अशक्यही शक्य करून दाखवले जाऊ शकते. भारताचं मिशन चांद्रयान नारीशक्तीचेही जिवंत उदाहरण आहे. या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला वैज्ञानिक आणि अभियंत्या जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी विविध प्रणालींचे प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापिका अशा महत्त्वपूर्ण जबादाऱ्या सांभाळल्या होत्या. भारताच्या कन्या आता अनंत समजल्या जाणाऱ्या आकाशाला आव्हान देऊ लागल्या आहेत. एखाद्या देशाच्या कन्या इतक्या महत्वाकांक्षी होतात तर, त्या देशाला विकसित होण्यापासून कोण अडवू शकेल? असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
हेही वाचा – आम्ही देशद्रोही मग लोकांच्या मृत्यूला जबाबादार असणाऱ्यांना काय म्हणायचं? अमित ठाकरेंचा सवाल
आपण इतके उंच उड्डाण यासाठी घेतले आहे, कारण आपली स्वप्नेही मोठी आहेत आणि प्रयत्नही मोठे आहेत. चांद्रयान -3च्या यशात आमच्या वैज्ञानिकांसोबतच इतर क्षेत्रांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. यानाचे सर्व भाग आणि तांत्रिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कितीतरी देशवासीयांनी योगदान दिले आहे. जेव्हा सर्वांचे हातभार लागले, त्याचे फळही मिळाले. हेच चांद्रयान-3चे सर्वात मोठे यश आहे. मी मनोकामना करतो की पुढेही आपले अंतराळ क्षेत्र आणि सर्वांचे प्रयत्न असेच यश मिळवत राहील, असे त्यांनी सांगितले.