जेएनयूमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान; पवई आयआयटी आत्महत्येचे पडसाद?

रविवारी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती निमित्त जेएनयूएसयू कार्यालयात एबीव्हीपीकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली. या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहण्यात आले. मात्र जेएनयूएसयूच्या सदस्य विद्यार्थ्यांनी प्रतिमेचा अवमान केला, असा आरोप एबीव्हीपीकडून करण्यात आला आहे. जेएनयूएसयू कार्यालयात स्क्रीनिंगच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तेथील सर्वच वस्तू काढण्यात आल्या. त्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमाही काढण्यात आली, असा दावा केला जात आहे.

 

नवी दिल्लीः जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याची घटना रविवारी आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात घडली. यावेळी आखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) व डाव्यांची विद्यार्थी संघटना (जेएनयूएसयू) यांच्यामध्ये हाणामारीही झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही विद्यार्थी संघटनांना शांत राहण्याचे आवाहन केले.

रविवारी १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती निमित्त जेएनयूएसयू कार्यालयात एबीव्हीपीकडून शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली. या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहण्यात आले. मात्र जेएनयूएसयू सदस्य विद्यार्थ्यांनी प्रतिमेचा अवमान केला, असा आरोप एबीव्हीपीकडून करण्यात आला आहे. जेएनयूएसयू कार्यालयात स्क्रीनिंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी तेथील सर्वच वस्तू काढण्यात आल्या. त्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमाही काढण्यात आली, असा दावा केला जात आहे. तर जेएनयूएसयूच्या कार्यालयात शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यासाठी जेएनयूएसयूच्या कार्यकारिणी मंडळाची परवानगी बंधनकारक आहे. मात्र एबीव्हीपीने ही परवानगी न घेताच शिवाजी महाराजांची प्रतिमा जेएनयूएसयू कार्यालयात लावली. त्यावरून वाद झाला, असेही या वादाचे कारण सांगितले जात आहे.

शिवजयंती निमित्त एबीव्हीपीने शिवाजी महाराजांची प्रतिमा लावल्यानंतर डाव्या संगटनेचे सदस्य विद्यार्थी तेथे आले. त्यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अवमान केला. आम्ही त्यांना ओळखत नाही. त्यांची प्रतिमा येथे नको, असे सांगत त्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांचा अवमान केला, असा आरोप एबीव्हीपीने केला आहे.

मात्र मुंबईतील पवई आयआयटी संकुलात दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. १८ वर्षीय सोलंकीच्या आत्महत्येचे पडसाद सर्वत्र उमटले. सोलंकीच्या आत्महत्येच्या निषेधार्थ जेएनयूमध्ये कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सोलंकी मागास जातीचा असल्याने त्याला त्रास देण्यात आला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा आरोप करत यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी कॅंडल मार्चमध्ये करण्यात आली. त्यावेळी एबीव्हीपी सदस्य विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. एबीव्हीपी जाती द्वेषाचे समर्थन करत आहे. त्यातूनच हा वाद झाल्याचेही बोलले जात आहे.

अजूनही या वादाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे जेएनयूमधील नव्हते. हे सर्व बाहेरून आले होते, असाही दावा केला जात आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.