नवी दिल्ली : सोन्याच्या तस्करी प्रकरणी सोमवारी (3 फेब्रुवारी) रात्री महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने कन्नड अभिनेत्री रान्या रावला केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KIA) अटक केली. रान्या दुबईहून बेंगळुरूला आली होती. तिच्याकडे 14 किलो सोन्याचे बार सापडले असून तिने ते कपड्यांमध्ये लपवले होते. याशिवाय तिच्याकडे 800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही सापडले. मंगळवारी (4 फेब्रुवारी) संध्याकाळी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (Actress Ranya Rao Arrested caught at bangalore airport with 14 kg gold)
हेही वाचा : Nashik : चारित्र्याचा संशयावरून गर्भवती पत्नीचा खून; मृतदेह टाकला नदीपात्राजवळ
तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, ती बंगळूरू विमानतळावरून सक्रियपणे कार्यरत असलेल्या सोन्याच्या तस्करी टोळीचा भाग आहे. तसेच, रान्या राव ही कर्नाटकातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. राव हे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांकडून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, अभिनेत्री रान्या राव गेल्या 15 दिवसांमध्ये 4 वेळा दुबईला प्रवास करून आली होती. हे लक्षात आल्यानंतर पोलिसांना तिच्यावर संशय बळावला. यानंतर, सोमवारी रात्री तिला प्रथम तपासणीसाठी तसच नंतर चौकशीसाठी रोखण्यात आले. तपासावेळी, तिच्याकडून मोठ्या प्रमाणात सोने जप्त करण्यात आले.
रान्या रावचे वडील आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी डीजीपी के. रामचंद्र राव यांनी तिच्या या सर्व घडामोडींपासून दूर ठेवल्याचे समोर आले आहे. प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “रान्याने चार महिन्यांपूर्वी जतीन हुक्केरीशी लग्न केले होते. तेव्हापासून तिने आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्हाला तिच्या किंवा तिच्या पतीच्या कामाबद्दल काहीही माहिती नव्हती. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का असून आम्हीही निराश आहोत. जर तिने कोणताही कायदा मोडला असेल तर तिला शिक्षा होईल.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोण आहे रान्या राव?
रान्या राव ही कन्नड सिनेक्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रान्या राव ही मुळची कर्नाटक राज्यातील चिकमंगलूर जिल्ह्यातील आहे. बंगळुरूमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. तिने 2014 मध्ये कन्नड सुपरस्टार सुदीपसोबत माणिक्य या सिनेमात झळकली होती. त्यानंतर तिने 2016 मध्ये वागाह या तमिळ सिनेमात काम केले होते. तसेच, 2017 मध्ये पतकी या कन्नड सिनेमात काम केले होते.