नवी दिल्ली : हिंडनबर्ग प्रकरण असो किंवा काँग्रेसचे आरोप असो यामुळे सतत चर्चेत असणारे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी आता पुन्हा एकदा फसले आहेत. अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावर आता भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. (adani group case bjp rebuts congress rahul gandhi claims on bjp government modi)
भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी या प्रकरणावरून कॉंग्रेसने केलेल्या आरोपांचा समाचार घेतानाच विरोधी पक्षावर टीका केली. अदानींवर आरोप करताना अमेरिकन न्यायालयात जी कागदपत्रे देण्यात आली आहेत, त्यात हे घोटाळे 2021 आणि 2022 दरम्यान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशा या राज्यांमधेच हे घोटाळे झाल्याचा उल्लेख आहे. ज्या काळातील हे घोटाळे आहेत, त्यावेळी या चारही राज्यांमध्ये भाजपाचे किंवा भाजपाने पाठबळ दिलेले सरकारही नव्हते. या चारही राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांची सरकारे असल्याचे संबित पात्रा यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Gautam Adani : अदानींना अटक करून चौकशी करा…कॉंग्रेस नेते राहुल गांधींची मागणी
केंद्रातील भाजप सरकार आणि देशाच्या हिताचा विचार करणाऱ्यांवर टीका करण्याची राहुल गांधी यांची एकच एक पद्धती आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आताही भाजपावर आरोप केला आहे. राफेल प्रकरणी देखील राहुल गांधी यांनी अशाच पद्धतीने आरोप केल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
भारतातील एका कंपनीवर अमेरिकेत सध्या खटला सुरू आहे. सध्या केवळ आरोप आहेत. जर कंपनीवर केस सुरू असेल तर त्याबाबतचे स्पष्टीकरण कंपनी देईल. आणि कायदा त्याचे काम करेल. हा संपूर्ण प्रकार जुलै 2021 ते फेब्रुवारी 2022 दरम्यानचा आहे. अमेरिकेतील न्यायालयात सुरू असलेल्या केसमध्ये ज्या चार राज्यांचे नाव आले आहे, त्यात छत्तीसगड एसडीसीचे नाव आहे. तेव्हा छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार होते, याची आठवण पात्रा यांनी करून दिली.
या कागदपत्रांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक देवाण घेवाण झाल्याचे समोर आले आहे. तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये कोणाचे सरकार होते, अशी विचारणा पात्रा यांनी केली. भाजपाचे तर नव्हते. तेव्हा वायएसआर कॉंग्रेसचे सरकार होते. यात तामिळनाडूचे नाव आहे, तिथेही कॉंग्रेसचा सहयोगी पक्ष डीएमकेचे सरकार होते. आणि ओडिशामध्ये बीजू जनता दलाचे सरकार होते. या चारही राज्यांचे नाव अमेरिकेत दाखल कागदपत्रांमध्ये आहे. तिथे भाजपा नव्हे तर कॉंग्रेस आणि सहकारी पक्षांचे सरकार होते, असे संबित पात्रा म्हणाले.
हेही वाचा – Delhi Assembly Election : महाराष्ट्रानंतर दिल्लीची बारी, विधानसभा निवडणुकीसाठी आपची पहिली यादी जाहीर
राहुल गांधींवर निशाणा साधताना पात्रा म्हणाले की, आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान मोदी यांची विश्वासार्हता संपल्याचे वक्तव्य केले आहे. अदानी यांच्यामागे मोदी उभे आहेत, त्यामुळे जागतिक स्तरावर मोदी यांची विश्वासार्हता संपली असल्याचे गांधी सांगतात. पण, मोदी यांची विश्वासार्हता संपवण्याचा हा आपला पहिलाच प्रयत्न नसल्याची आठवण पात्रा यांनी यावेळी करून दिली. 2002 पासून तुम्ही, तुमची आई आणि तुमचा पक्ष करत असल्याचेही म्हणाले. यासोबतच अदानी प्रकरणी गुरुवारी शेअर मार्केट कोसळल्यावरूनही भाजपाने कॉंग्रेसवर आरोप केला आहे. याआधीही कॉंग्रेसने अनेक प्रकरणांमध्ये शेअर मार्केटवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे मार्केट पडेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल, असाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे, असेही ते म्हणाले. (adani group case bjp rebuts congress rahul gandhi claims on bjp government modi)
Edited by : Ashwini A. Bhatavdekar