आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील जम्मालामादुगु येथील अदानी ग्रुपच्या एका ऑफिसमध्ये गोंधळ झाला आहे. आंध्र प्रदेशातील स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या समर्थकांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. तसेच त्या कार्यकर्त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी अदानी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच अदानी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीप्रकरणी सहभागी असलेल्या त्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. (Adani Group staff beaten up by BJP MLA C Adinarayana Reddy supporters.)
हेही वाचा : Gautam Adani : अदानी पुन्हा फसले, अमेरिकेने भ्रष्टाचार आणि लाचखोरीसारखे गंभीर आरोप लावले
ही घटना कडप्पा जिल्ह्यातील जमलामादुगु विधानसभा मतदारसंघातील कोंडापुरम रागीकुंता गावाजवळ घडली आहे. या ठिकाणी अदानी ग्रुप कंपनी ही एक पॉवर प्लांट तयार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अदानींकडून त्या ठिकाणी कॅम्प ऑफिस तयार करण्यात आले आहे. मात्र तेथील रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी तेथील कार्यालयात जाऊन बांधकाम सुरू करण्यापूर्वी आमदार रेड्डी यांची परवानगी का घेतली नाही असे विचारले आहे. त्यानंतर त्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. काही वेळाने त्यांनी अदानी ग्रुपच्या त्या कार्यालयाची तोडफोड केली तसेच तेथील कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये कार्यालयाचे मोठे नुकसान झाले असुन खिडकीच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. सदरची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा : Vinod Tawde : पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी विनोद तावडेंनी… विवांता हॅाटेलचा आणखी एक व्हिडिओ समोर
या जागेवर सध्या अदानी ग्रुप 470 एकरवर 1000 मेगावॅटचा पंप स्टोरेज पॉवर प्लांट तयार करत आहे. अदानी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून या हल्ल्यामध्ये जे कार्यकर्ते सहभागी होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसआय ऋषिकेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. तसेच कडप्पा लोकसभा मतदारसंघाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एकीकडे राज्य सरकार आंध्र प्रदेशात उद्योग आणण्याविषयी घोषणा करत आहे तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार खंडणी आणि ब्लॅकमेलिंग करण्यात गुंतले आहेत.
Edited By Komal Pawar Govalkar