घरअर्थजगत'या' कारणांमुळे अदानी ग्रुपचे ४३ हजार ५०० कोटींचे शेअर्स गोठवले

‘या’ कारणांमुळे अदानी ग्रुपचे ४३ हजार ५०० कोटींचे शेअर्स गोठवले

Subscribe

आशिया खंडातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स आज कोसळले. सोमवारी बाजार उघडल्यानंतर अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांचे समभाग ५ ते २५ टक्क्यांपर्यंत खाली आले. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एन्टरप्राईजेसचे शेअर्स २५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. ही घसरण दशकात नोंदविण्यात आलेली ही सर्वात मोठी घसरण आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांमधील काही एफपीआय खाती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) गोठविली आहेत. या बातमीनंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी सकाळी व्यापारात २५ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण दिसून आली. मीडिया रिपोर्टनुसार, एनएसडीएलने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांचा वाटा असलेल्या तीन परदेशी फंडांची खाती गोठविली आहेत. अहवालात असं सांगण्यात आलं आहे की ही खाती ३१ मे रोजी किंवा त्यापूर्वी जप्त करण्यात आली होती. रॉयटर्सच्या अहवालात म्हटलं आहे की एनएसडीएलने Albula Investment Fund, Cresta Fund आणि APMS Investment Fund ची खाती गोठविली आहेत. या कंपन्या अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे प्रमुख भागीदार आहेत.

- Advertisement -

अदानीच्या शेअर्सवर परिणाम

हे फंड परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणून बाजार नियामक संस्था सेबी (Security Exchange Board of India) कडे नोंदणीकृत आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, या फंड्सचा अदानी एंटरप्रायझेसमध्ये ६.८२ टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये ८.०३ टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये ५.९२ टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये ३.५८ टक्के हिस्सा आहे. रॉयटर्सच्या अहवालात म्हटलं आहे की या सर्व फंडांनी मिळून अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सुमारे ४३,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

का गोठवण्यात आली खाती?

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालात असं म्हटलं आहे की नियमांनुसार संपूर्ण माहिती जाहीर न केल्यामुळे या निधीविरूद्ध ही कारवाई करण्यात आली असावी. असा नियम आहे की मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) कंपन्यांना फायदेशीर मालकीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल, परंतु कदाचित या संदर्भात संपूर्ण माहिती दिली गेली नाही. सेबी आणि एनएसडीएलने याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेलं नाही.

- Advertisement -

बाजार सुरु होताच बीएसई वर अदानी एंटरप्राईजेस २४.९९ टक्क्यांनी घसरून १,२०१.१० रुपयांवर, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन १८.७५ टक्क्यांनी घसरून ६८१.५० रुपयांवर बाजार बंद झाला. अदानी ग्रीन एनर्जी पाच टक्क्यांनी घसरून १,१६५.३५ रुपये, अदानी टोटल गॅस पाच टक्क्यांनी घसरून १,५४४.५५ रुपये, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के खाली १,५१७.२५ वर, अदानी पॉवर ४.९९ टक्क्यांनी घसरून १४०.९० रुपयांवर आलं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -