घरCORONA UPDATEकोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आता मेडिकल स्टोअर्सची मदत!

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी आता मेडिकल स्टोअर्सची मदत!

Subscribe

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागलेली असताना लक्षणं दिसत नसलेले देखील कोरोनाग्रस्त असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण शोधणं हे मोठं कठीण काम आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनावर येऊन पडलं आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये प्रशासनाने कोरोनाग्रस्त रुग्ण शोधण्यासाठी नवी कल्पना शोधून काढली आहे. आता शहरातले कोरोनाग्रस्त रुग्ण शोधण्यासाठी प्रशासन मेडिकलची मदत घेणार आहे. त्यातून कोरोनाची लक्षणं असलेले रुग्ण सापडण्याचा विश्वास स्थानिक प्रशासनाला वाटत आहे.

कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी सध्या मुंबईत सील करण्यात आलेल्या भागात घरोघरी जाऊन नमुने गोळा केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर कानपूरमध्ये प्रत्यक्ष घरी न जाता थेट त्या भागातल्या मेडिकलशीच संपर्क साधण्याची कल्पना राबवण्यात येत आहे. कानपूर प्रशासनाने सर्व मेडिकल स्टोअर्सला निर्देश दिले आहेत की त्यांच्याकडे औषधं घेण्यासाठी येणाऱ्या सर्व रुग्णांची नाव, पत्ते, मोबाईल क्रमांक अशी माहिती नोंद करून ठेवा. विशेषत: जे रुग्ण सर्दी, खोकला किंवा तापासाठी पॅरासिटॅमॉलची मागणी करतील, अशा रुग्णांची माहिती नोंद करून ठेवायला सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

सर्दी, खोकला किंवा ताप ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं आहेत. त्यामुळे यातून त्या भागामध्ये कोरोनाचे संभाव्य रुग्ण कुठे आणि कोण असतील, याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होईल आणि त्यानुसार त्यावर कारवाई करता येईल. कानपूर विभागात येणाऱ्या सर्व सहा जिल्ह्यांना हा नियम लागू असेल. कानपूरचे विभागीय आयुक्त डॉ. सुधीर बोबडे यांनी हे आदेश दिले आहेत. यामध्ये जर कुठला रुग्ण संशयित आढळला, तर त्याची तातडीने चाचणी करून त्याला होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. मेडिकलप्रमाणेच डॉक्टरांनाही त्यांच्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या सर्व रुग्णांचं एक रेकॉर्ड तयार करायला सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -