अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 जण ठार, 40 हून अधिक जखमी

afghanistan kabul blast explosion in kabul mosque during namaz 30 killed 40 injured

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत भीषण बॉम्बस्फोटाची घटना समोर आली आहे. या स्फोटात आत्तापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जखमी झाले आहेत. या स्फोटात एका प्रमुख मौलवीचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. खैर खाना शहरातील पीडी 17 भागात असलेल्या सिद्दिकिया मशिदीत हा स्फोट झाला आहे. लोकं नमाज पठण करत असताना अचानक हा स्फोट झाला. यामुळे काबूलमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी स्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

या स्फोटानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान जखमींपैकी 30 हून अधिक जणांना आतापर्यंत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत आधीच गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशात बॉम्बस्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या गुरुवारी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात तालिबानचा एक प्रमुख नेता मारला गेला. रहिमुल्लाह हक्कानी असे ठार झालेल्या तालिबान म्होरक्याचे नाव आहे.

स्फोटातील प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा एक आत्मघाती हल्ला होता. या स्फोटात मौलवी मुल्ला अमीर मोहम्मद काबुली यांचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे. या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 27 जणांना तेथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये पाच मुलांचाही समावेश आहे. तालिबानचे प्रवक्ते खालिद झद्रान यांनी काबूलमधील मशिदीमध्ये स्फोट झाल्याची पुष्टी केली, परंतु मृत किंवा जखमींबद्दल तपशील दिलेला नाही. तालिबानने जारी केलेल्या निवेदनात या स्फोटाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.


भाजप नेत्यांनी पोरखेळ लावलाय तो बंद करावा, अन्यथा..,राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा