आफताब पुनावाला प्रशिक्षित शेफ, म्हणून मृतदेहाचे तुकडे…; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

shraddha murder case who is that girl whom aftab called at home after shraddhas murder police discovered

नवी दिल्ली – श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाची दिल्लीतील साकेट कोर्टात सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी काल सुनावणी झाली, त्यावेळी आफताब प्रशिक्षित शेफ असल्याचा दावा पोलिसांनी केला. त्याला मांस कसे संरक्षित करायचे हे माहित होते, म्हणूनच त्याने श्रद्धाची हत्या केली असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरता तिच्या शरीराचे लहान लहान तुकडे केले होते. तसेच, जवळपास सहा महिने हे तुकडे त्याने घरातील फ्रीजमध्ये लपवून ठेवले. आफताब हा अतिशय हुशार असून तो ताज हॉटेलचा प्रशिक्षित शेफ आहे. त्याला मांस कसे टिकवायचे हे माहीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रध्दा वालकरची हत्या केल्यानंतर आरोपीने बर्फ, अगरबत्ती आदी वस्तू मागवून मृतदेह सुरक्षित ठेवण्याची पूर्ण तयारी केली होती.

पोलिसांनी साकेत न्यायालयात सांगितले की, तो इतका धूर्त होता की, त्याने श्रद्धा वालकरची हत्या करून तिचा मृतदेह घरात ठेवला आणि त्यानंतर नवीन संबंध सुरू केले आणि आपल्या नवीन मैत्रिणीला अंगठी गिफ्ट केली. दिल्लीचे पोलीस अधिकारी अमित प्रसाद यांनी या हत्येची संपूर्ण घटना न्यायालयात संपूर्ण क्रमाने सांगितली.

आफताबने बदलले वकील, पुढील सुनावणी २० मार्चला
आरोपी आफताब अमीन पुनावालाने आपला वकील एमएस खान बदलला आहे आणि म्हणून सर्व कागदपत्रे त्याच्या नवीन कायदेशीर मदत सल्लागार (LAC) कडे सोपवण्यात आली आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश मनीष खुराणा कक्कर यांनी एलएसीला या प्रकरणात आगाऊ युक्तिवाद करण्यासाठी वेळ दिला. पुढील सुनावणीची तारीख 20 मार्च निश्चित करण्यात आली आहे. आफताबवर मे २०२२ मध्ये मेहरौली परिसरात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरचा गळा आवळून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. आफताब १२ नोव्हेंबर २०२२ पासून कोठडीत आहे.

पोलिसांनी 6,629 पानांचे आरोपपत्र केले दाखल
24 जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी आफताबच्या हत्येप्रकरणी 6,629 पानांचे मोठे आरोपपत्र दाखल केले. भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 302, 201 आणि इतर कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान, आफताबवरील आरोप सिद्ध करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी नार्को चाचणी अहवाल, पॉलीग्राफ चाचणी अहवाल आणि डीएनए चाचणी अहवाल न्यायालयात सादर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 150 हून अधिक साक्षीदार तपासण्यात आले असून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी आफताबच्या आवाजाचे नमुनेही घेतले आहेत.