घरदेश-विदेशEngineering प्रमाणेच आता मातृभाषेतून होता येणार 'MBA'

Engineering प्रमाणेच आता मातृभाषेतून होता येणार ‘MBA’

Subscribe

मराठी भाषेमध्ये इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम सुरु केल्यानंतर आता ‘एमबीए’ देखील मातृभाषेतून होता येणार आहे. इंजिनीयररिंग अभ्यासक्रम यंदापासून मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सुरू होत असून लवकरच मॅनेजमेंट व फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंगसारख्या अतांत्रिक अभ्यासक्रमांचे शिक्षणही प्रादेशिक भाषांमध्ये घेता येणं शक्य होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील माहिती दिली असून त्यादिशेने केंद्र सरकारची तयारी सुरू असल्याचेही सांगितले.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता असलेल्या १३ महाविद्यालयांमध्ये इंजिनीयरिंगचे मेकॅनिकल, सिव्हिल , कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) हे अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रादेशिक भाषांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, तमीळ आणि तेलुगू भाषांमध्ये ते शिकवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यासोबत नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण प्रादेशिक भाषांमधून देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रादेशिक भाषांमध्ये इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एआयसीटीईचे गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू आहे. एआयसीटीईची मान्यता असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरु असल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

तसेच इंजिनीयर होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यात रस आहे का यासंदर्भात गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘मातृभाषेतून पदवीपूर्व अभियांत्रिकी शिक्षण’ हे सर्वेक्षण करण्यात आले होते. एआयसीटीईची मान्यता असलेल्या महाविद्यालयांमधील ८३ हजार विद्यार्थ्यांची मते त्यात जाणून घेण्यात आली. त्यात ४४ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला मातृभाषेतून इंजिनीयर होण्यास आवडेल, असे सांगितले होते. त्यामध्ये तामीळ विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. भविष्यात तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांबरोबरच अन्य अभ्यासक्रमही प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होतील. त्यात व्यवस्थापनासह फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरियर डिझायनिंग, ट्रव्हल अॅन्ड टूरीझम, टेक्सटाईल्स मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, ड्रेस डिझायनिंग अॅन्ड गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, फूड सायन्स आदी अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे

नव्या अभ्यासक्रमांना सुरुवात

दरम्यान, मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणारी इंजिनीअरिंग महाविद्यालये विद्यापीठाकडे मराठीत इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रस्ताव पाठवू शकतात. त्या महाविद्यालयांना आाता मराठीतून इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाची परवानगी देण्यात येणार आहे. औद्योगिक गरजा लक्षात घेऊन अभियांत्रिकीच्या आठ शाखांमध्ये उद्योन्मुख नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. ज्यामध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड डेटा सायन्स, आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (डेटा सायन्स), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (आर्टीफिशिअल इंटेलिजेंस अँड मशिन लर्निंग), कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग (इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्ल्युडिंग ब्लॉकचेन टेक्नोलॉजी) अशा अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.


…आणि गृहमंत्री पुरात अडकले, हेलिकॉप्टरने केलं रेस्क्यू

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -