तिन्ही सैन्य दलांत यापुढे अग्निवीर

योजना मागे घेण्यास केंद्राचा ठाम नकार, जाळपोळीत सामील तरुणांची संधी हुकणार

अग्निपथ योजना मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरात अग्निकल्लोळ माजलेला असतानाच रविवारी संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत ही योजना मागे घेण्यात येणार नाही, असे ठामपणे सांगितले. सोबतच यापुढे तिन्ही सैन्य दलांत केवळ अग्निपथ योजनेच्या माध्यमातूनच जवानांची भरती होईल हेदेखील स्पष्ट केले. एवढेच नाही तर गुन्ह्याची नोंद असलेल्या जाळपोळीत सामील तरुणांना यापुढे अग्निवीर होता येणार नाही. तिन्ही सैन्य दलांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली. १ जुलैला अग्निवीरांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी होणार आहे. त्यानुसार २५ हजार अग्निवीरांची पहिली तुकडी डिसेंबरमध्ये सैन्यात दाखल होईल.

यावेळी अनिल पुरी यांनी स्पष्ट केले की, लष्करातील बदलाची प्रक्रिया १९८९ पासून सुरू आहे. २०५०पर्यंत ५० टक्के देशातील लोकसंख्या ५० वर्षांच्या आतील असेल. त्यामुळे लष्कराला जोश आणि होश असणार्‍या तरुणांची गरज आहे. लष्कराचे सरासरी वय ३२ वर्षे होते. ते २६पर्यंत खाली आणण्याचे आमचे लक्ष्य होते. तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस यांनी मिळून जगातील सर्व देशांच्या लष्कराचे सरासरी वय पाहिले. यावर २ वर्षे संशोधन करण्यात आले. खूप विचारविनिमय केल्यानंतर ही योजना लागू केली आहे. त्यामुळे यापुढे अग्निपथ योजनेच्या माध्यमातूनच सैन्यभरती होईल. देशाच्या संरक्षणासाठी तरुणांच्या योगदानाची गरज आहे. देशाला तरुण बनवण्याची ही एक संधी आहे. तरुणांनी शारीरिकदृष्ठ्या तयार असले पाहिजे, जेणेकरून ते आमच्यासोबत सामील होऊन प्रशिक्षण घेऊ शकतील.

कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणार्‍यांनी प्रवृत्त केले
ही योजना लागू केल्यानंतर हिंसाचार होईल असा आम्हाला अंदाज नव्हता. कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणार्‍यांनी विद्यार्थ्यांना अग्निपथविरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले, असा दावा अनिल पुरी यांनी केला. सशस्त्र दलात शिस्तभंगाला स्थान नाही. त्यामुळे अग्निवीर होणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या जाळपोळ, हिंसेमध्ये सहभागी होणार नाही हे प्रत्येकाला लेखी द्यावे लागेल, असेही पुरी यांनी स्पष्ट केले.

यावेळी भारतीय लष्कराचे अ‍ॅडज्युटंट लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा, भारतीय नौदलाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि भारतीय वायूसेनेचे कार्मिक प्रभारी एअर मार्शल सूरज झा हेदेखील उपस्थित होते.