Air India च्या विमानांची उड्डाणं ‘या’ ७ दिवसांसाठी अंशत: केली रद्द

एअर इंडियाने देशांतर्गत होणाऱ्या काही विमानांची उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी ते २४ जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनी सकाळी १०.३० ते दुपारी १२.४५ पर्यंत दिल्लीला जाणारी आणि दिल्लीहून उड्डाण घेणारी काही विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. परंतु नियोजित वेळेच्या आधी किंवा नंतर होणारी उड्डाणं नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.

७४ व्या प्रजासत्ताक दिनापर्यंत एका आठवड्यासाठी दररोज सुमारे तीन तास हवाई क्षेत्र प्रतिबंधित केले जाईल, असेही एअरलाइनने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणाच्या वेळेतही बदल करण्यात येणार आहे. एलएचआर (लंडन), आयएडी (डलेस), ईडब्ल्यूआर (नेवार्क), केटीएम (काठमांडू) आणि बीकेके (बँकॉक) या पाच स्थानकांवरून लांब आणि कमी पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशनला एक तास उशीर होणार आहे.

मात्र, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत कोणतेही आंतरराष्ट्रीय ऑपरेशन रद्द करण्यात आलेले नाही. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विमानांची स्थिती कशी असेल, हे तपासून घेण्याची विनंती एअर इंडियाने प्रवाशांना केली आहे.


हेही वाचा : नोकरी घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसादांविरोधात खटला चालविण्यास गृह मंत्रालयाकडून परवानगी