महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला पेच अद्यापही सुटला नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे एकनाथ शिंदे यांनी दावा सोडल्यामुळे स्पष्ट झालं आहे. मात्र, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे वाटप होणार का? अशीही चर्चा रंगली होती. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अजितदादा पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर अजितदादांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीची दिल्लीत बैठक होणार आहे. त्यासाठी अजितदादा पवार हे दिल्लीला गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजितदादा पवार ) कार्यालयात अजितदादांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजितदादांनी काही प्रश्नांवर चिडून तर काहींवर टोलेबाजी करत उत्तर दिली आहेत.
हेही वाचा : तुम्हाला ‘CM’ म्हणून पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार? प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले, “मी काय..”
अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेतले जाणार आहे का? असा काही फॉर्म्युला ठरलाय का? हा प्रश्न अजितदादांना विचारल्यावर ते म्हणाले, “ए एक भाकरी आहे का? अर्धी याला दे, चतकूर इकडे आणि चतकूर इकडे दे… अरे काय आहे… आम्ही तुला मगापासून हात जोडून सांगतोय, अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत त्याबद्दल चर्चा होईल.”
“राज्याचं सरकार आहे. तेरा ते चौदा कोटी जनतेचं नेतृत्त्व करायचं आहे. आम्ही एका विचाराने पुढे जात आहे. राज्याचा विकास करणे हे आमचं ध्येय आहे. केंद्रात आमच्या विचाराचं सरकार असल्यानं जास्तीत-जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न आहे. आमच्या योजना कशा निट चालतील आणि दिलेली आश्वासनं पूर्ण करणे हे आमचं ध्येय आहे,” असं अजितदादांनी सांगितलं.
यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजून पाच वर्षे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची वाट पाहावी लागणार का? असा प्रश्न एका पत्रकारानं विचारला. या प्रश्नावर अजितदादा चिडल्याचे पाहायला मिळाले.
अजितदादांनी म्हटलं, “मी काय ज्योतिषी नाही. त्यासंदर्भात आमची चर्चा होणार आहे. देशाचा आणि राज्याचा सर्वांगिण विकास व्हावा, हे आमचं ध्येय आहे. त्यादृष्टीनं आम्ही पुढे चाललो आहे.”
हेही वाचा : “जाणता राजांनी महाराष्ट्राचं खूप वाटोळं केलंय, आता…”, भाजपच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर विखारी टीका