UP Election 2022 : सत्तेत आल्यास शेतकरी आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाख देणार; अखिलेश यादव यांची घोषणा

akhilesh yadav

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या आश्वासनांचा आणि घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आली तर शेतकरी आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली केली आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा मागे घेऊन मोठी राजकीय खेळी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानेही तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जातील. हा निर्णय घेऊन भाजपने विरोधकांच्या हातून मोठा मुद्दा हिसकावून घेतला आहे. अशा परिस्थितीत आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांना साधे ठेवण्यासाठी मोठी राजकीय खेळी केली आहे.

अखिलेश यादव यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करताना मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. सपा अध्यक्षांनी बुधवारी ट्विट केले की, “शेतकऱ्याचे जीवन अमूल्य आहे, कारण तो ‘इतरांच्या’ जीवनासाठी ‘अन्न’ पिकवतो. अशा परिस्थितीत २०२२ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार येताच शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना २५ लाखांची ‘किसान शहादत सन्मान राशि’ देण्यात येईल, असे आम्ही वचन देतो.”

तीनही कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने कायदा मागे घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींना पत्र लिहून अनेक मागण्या केल्या होत्या. यामध्ये कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती.