कोरोनाच्या भीतीपोटी जिवंत प्राण्यांची बाजारपेठ बंद करण्याची गरज नाही – WHO

चीनच्या वुहान मार्केटमधून करोना विषाणूचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर या बाजारपेठा बंद करण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या भीतीपोटी जिवंत प्राण्यांची बाजारपेठ बंद करण्याची गरज नाही, असं WHO ने म्हटलं आहे.

WHO on Wuhan tour, finding out the cause of Corona's origin
WHO वुहान दौऱ्यावर, कोरोना उत्पतीचं कारण काढणार शोधून

चीनच्या वुहान मार्केटमधून करोना विषाणूचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे. वुहानच्या मार्केटमध्ये जिवंत प्राण्यांची विक्री केली जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर या बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटेनेने जगभरात अशा बाजारपेठा बंद करा असा कोणताही सल्ला आपण दिला नाही असा खुलास केला आहे. जिवंत प्राण्यांची बाजारपेठ जगभरातील अनेक लोकांच्या कमावण्याचं साधन आहे. प्रशासनाने त्या बंद करण्याऐवजी त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत विचार केला पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे अन्न सुरक्षा आणि प्राणी रोग तज्ञ पीटर बेन यांनी सांगितलं.

“कोरोनाच्या या वाईट परिस्थितीत अन्न सुरक्षा कठीण आहे याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच अनेकदा बाजारपेठांमध्ये अशा गोष्टी घडल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही,” असं पीटर बेन म्हणाले. प्राण्यांमधून माणसांपर्यंत आजार जाऊ नये यासाठी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा दर्जा वाढवण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, चीनमधील वुहान मार्केटमधूनच कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे का? किंवा विषाणूचा फैलाव करण्यात या बाजारपेठेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे का? याबद्दल अद्याप कोणताही पुरावा नाही. पण कोणत्या प्राण्यामधून कोरोना विषाणू माणसापर्यंत पोहोचला याबद्दल तपास सुरु आहे. इतर प्रजातीमून विषाणूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल्यास भविष्यात असे आजार रोखण्याच्या उपाययोजना करण्यास मदत मिळेल, असं पीटर बेन म्हणाले. नेमक्या कोणत्या प्राण्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला आहे याची माहिती मिळवण्यात वेळ लागू शकतो. ज्यांना सुरुवातीला कोरोनाची लागण झाली त्यांच्या मुलाखती घेऊन आरोग्य तज्ज्ञांना विस्तृत अभ्यास करण्याची गरज आहे. आजारी पडण्याआधी कशा पद्धतीने ते प्राण्यांच्या संपर्कात आले होते हे समजून घ्यावं लागेल, असं पीटर बेन यांनी सांगितलं आहे.


हेही वाचा – Coronavirus : देशभरात चोवीस तासांत ३ हजार ३२० नवे रुग्ण, ९५ जणांचा मृत्यू


दरम्यान, चीनने आजपर्यंत जागतिक आरोग्य संघटना किंवा बाहेरील कोणत्याही तज्ज्ञाला तपास करायला दिलेलं नाही. चीनमध्ये अशा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध असून आम्हाला अद्याप तरी कोणतीही समस्या जाणवलेली नाही,असं पीटर बेन यांनी सांगितलं.