घरदेश-विदेशपतंजली फूड पार्कबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

पतंजली फूड पार्कबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Subscribe

नोएडातील फूड पार्क रद्द करत असल्याची माहिती आचार्य बालकृष्णन यांनी ट्विटवरुून दिली. पण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हस्तक्षेप करत बाब रामदेव यांच्याशी चर्चा केली. नक्की कसे आहे फूड पार्क?काय खासियत आहे फूड पार्कची?

उत्तरप्रदेशातील पंतजलीचे मेगा फूड पार्क राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे रद्द करत असल्याची घोषणा पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्णन यांनी ट्विटरवरून केली. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली आणि खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष घालत बाबा रामदेव यांच्याशी चर्चा केली. शिवाय सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले. पण सध्या चर्चेत असलेले पंतजलीचे फूड पार्क नेमके आहे तरी कसे? काय आहे या फूड पार्कची खासियत पाहुयात…

फूड पार्कची योजना कशी आहे?

२००८ साली युपीए सरकारच्या काळात फूड पार्क ही संकल्पना मांडली गेली. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी आणि मालाचा योग्य तो मोबदला मिळावा यासाठी ही संकल्पना मांडली गेली. त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेत आले आणि या योजनेचे प्रधानमंत्री किसान संपदा योजना असे नामकरण केले गेले. सरकारतर्फे या फूड पार्कला आर्थिक मदत दिली जाणार आहे. पूर्ण देशभरात जवळपास ४२ फूड पार्कला सरकारने परवानगी दिली आहे. ४२ पैकी सध्या ४ फूड पार्क मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यापैकी नोए़डातील पतंजलीचे फूड पार्क एक आहे!

- Advertisement -

फूडपार्कची जन्मकथा

अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना पतंजलीच्या फूड पार्कला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये केंद्र सरकारने तत्वता: या फूड पार्कला मान्यता दिली. तब्बल ६ हजार कोटींची गुंतवणूक असलेले पतंजलीचे फूड पार्क हे सर्वात मोठ्या फूड पार्कपैकी एक आहे. ४५५ एकरवर या फूड पार्कची उभारणी करण्यात येणार असून त्यापैकी २५ एकरवर पतंजली आयुर्वेदिक इन्स्टिट्युट बांधण्यात येणार आहे. वर्षाला २५ हजार कोटींची उलाढाल या फुडपार्कमधून होणार आहे. तसेच १० हजार जणांना रोजगाराच्या संधी देखील मिळणार आहे. नोएडाप्रमाणे मध्यप्रदेश, छत्तीसगड, आसाम आणि तेलंगणामध्ये देखील फूड पार्क उभारण्याचा विचार आहे.

वादात अडकलेले फूडपार्क

देशातल्या सर्वात मोठ्या फूडपार्कपैकी एक असलेल्या फूड पार्कवरून सध्या वाद सुरू झाला आहे. योगी सरकार उदासीन असल्याचे कारण देत पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्णन यांनी नोएडातील फूड पार्क रद्द करत असल्याची घोषणा ट्विटरवरून केली. पण संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र बालकृष्णन यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. “बँक लोन आणि जमिनीसंदर्भातल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याचा अधिक अवधी पतंजलीला देण्यात आला आहे. निर्धारीत वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास फूड पार्क रद्द करण्याशिवाय पर्याय नसेल,” असे देखील यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. फूड पार्कसाठी सरकार पूर्ण सहकार्य करत असल्याचे देखील यावेळी अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

पतंजलीसाठी फूड पार्कचे महत्त्व

नोएडातील फूड पार्क पतंजलीसाठी खूप महत्त्वाचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी आणि बाजारपेठेतील दबदबा कायम ठेवण्यासाठी नोएडातील फूड पार्क महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवाय, FMCG अर्थात फास्ट मुव्हींग कन्झुमरच्या साखळीमध्ये देखील पतंजलीला बाजारपेठेवर ताबा मिळवण्यासाठी नोएडा फूड पार्क महत्त्वपूर्ण असणार आहे. या पार्कमुळे पतंजली आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत २५ ते ५० टक्के भारतीय बाजारपेठेवर ताबा मिळवू शकते. शिवाय कंपनीची वार्षिक उलाढाल ही २० ते २५ हजार कोटींनी वाढणार आहे. नोएडातील फूड पार्कमुळे पतंजलीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच कच्च्या मालाची उपलब्धता पाहता किंवा वितरणाच्या दृष्टीने देखील नोएडातील फूड पार्क पतंजलीसाठी महत्त्वपूर्ण आहे. जवळच असलेला नॅशनल हायवे आणि विमानतळामुळे मालाची ने-आण करणे हे देखील अधिक सोयीचे असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -