मुंबई : सध्या ‘इंडिया’ आणि ‘भारत’ नावावरून राजकारण तापले आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असा कलगीतुरा रंगला असतानाच महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ शेअर करत, मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच, ‘सगळे भारतीय लक्षात ठेवतील,’ असे म्हटले आहे.
धन्यवाद मोदीजी…
सगळे भारतीय लक्षात ठेवतील..
आणि
वोट INDIA लाच देतील…#jeetegaindia pic.twitter.com/BJH3sko0s3— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 5, 2023
सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटले आहेत. देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत विरोधकांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट दाखविली आहे. विरोधकांच्या या नव्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. या आघाडीची पाटणा, बंगळुरू आणि मुंबईत बैठका झाल्या. त्यातच आता राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरच्या निमंत्रणपत्रिकेत इंडियाचे राष्ट्रपती असे लिहिण्याऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकार ‘इंडिया’ला घाबरल्याची टीका केली आहे.
हेही वाचा – …मग तुमचं काळीज का धडधडतंय? ‘भारत’ उल्लेखावरून चित्रा वाघ यांचा विरोधकांना टोला
हा सर्व प्रकार सुरू असतानाच महाराष्ट्र काँग्रेसने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. वंशवाद, भाई-भतीजावाद, भ्रष्टाचार, महागाई, कुशासन यांच्या मुक्तीसाठी तसेच देशाची एकता, एक भारत श्रेष्ठ भारत, सुराज्य, सुशासन, विकास, देशाची सुरक्षितता अशा विविध कारणासाठी ‘इंडिया’ला मत देण्याचे आवाहन नरेंद्र मोदी जनतेला करत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. सगळे भारतीय लक्षात ठेवतील आणि वोट INDIAलाच देतील, असे सांगत महाराष्ट्र काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले आहेत.
हेही वाचा – Virender Sehwag : विश्वचषकात खेळाडूंच्या जर्सीवर ‘हे’ नाव असावं; सेहवागच्या मागणीने वाद होणार?
सरसंघचालकांचे आवाहन
अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तीन दिवसांपूर्वी आसाममधील गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना शतकानुशतके आपल्या देशाचे नाव भारत असल्याचे म्हटले होते. इंडियाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.