घरदेश-विदेश'तोशखान्या'तील मौल्यवान वस्तूंच्या लुटीत पाकिस्तानचे सर्वच नेते सहभागी!

‘तोशखान्या’तील मौल्यवान वस्तूंच्या लुटीत पाकिस्तानचे सर्वच नेते सहभागी!

Subscribe

इस्लामाबाद : पाकिस्तानातील तोशखान्याच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रथमच, पाकिस्तान सरकारने 2002पासून आतापर्यंत तोशखानामध्ये ठेवलेल्या भेटवस्तू आणि त्यांच्या लिलावाच्या सर्व नोंदी सार्वजनिक केल्या आहेत. त्यानुसार केवळ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानच नव्हे तर, इतर अनेक माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींवरही पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या कायद्यानुसार परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी म्हणजेच तोशखान्यात ठेवावी लागते. पाकिस्तानचे नेते आणि राष्ट्रप्रमुखांना परदेशातून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्याचे अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. यामध्ये सोन्याची प्लेट असलेली एके-47 रायफल, कोट्यवधी रुपयांची घड्याळे, महागडे पेन तसेच दागिन्यांचा समावेश आहे. तोशखान्यात जमा करून नेत्यांनीच त्या स्वस्तात खरेदी केल्याचे दिसते.

- Advertisement -

पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, 2002 ते 2023 या कालावधीतील तोशखान्यासंबंधीचा 466 पानांचा तपशील कॅबिनेट विभागाच्या वेबसाइटवर रविवारी अपलोड करण्यात आला. तोशखान्यातून भेटवस्तू मिळवणाऱ्यांमध्ये माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट आहेत. त्यात माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ, माजी पंतप्रधान शौकत अझीझ, माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ, माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशिवाय विद्यमान पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या व्यवहारांचा समावेश आहे.

- Advertisement -

परवेझ मुशर्रफ यांनी खरेदी केली महागडी घड्याळे
सन 2001 ते 2007 तसेच 2007 ते 2008 या काळात पाकिस्तानचे हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांना 65 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या. परवेझ मुशर्रफ यांना वेगवेगळ्या वेळी डझनभर महागडी घड्याळे आणि मौल्यवान दागिन्यांचे बॉक्स मिळाल होते. हे त्यांनी कायद्यानुसार पैसे देऊन आपल्याकडेच ठेवून घेतले. याशिवाय ज्यांना कमी किमतीच्या भेटवस्तू मिळाल्या, त्यांनी त्या भेटवस्तू स्वत:जवळ ठेवल्या. कारण 2022 मध्ये 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या भेटवस्तू विना पेमेंट ठेवण्याचा कायदा होता. याव्यतिरिक्त कमी किमतीच्या भेटवस्तू प्रत्येकाने आपल्याकडेच ठेवून घेतल्या.

नवाझ शरीफांनी अल्पकिमतीत खरेदी केली मर्सिडीज
तीन वेळा पंतप्रधानपदी भूषविणारे आणि पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ यांना एप्रिल 2008मध्ये 6,36,888 रुपये देऊन 42 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ कार आपल्या नावावर करून घेतली. नोव्हेंबर 2013 मध्ये त्याने रोलेक्स घड्याळ आणि इतर काही वस्तूंसाठी एकूण 2 लाख 43 हजार रुपये दिले. त्यावेळी रोलेक्स रिस्टवॉचची किंमत 11.8 लाख रुपये होती.

नवाझ शरीफ यांच्याकडे 2 दशलक्ष रुपये किमतीचे क्रिस्टोफर क्लॅरेट घड्याळ, 19.5 दशलक्ष रुपये किमतीची अंगठी आणि 16 दशलक्ष रुपये किमतीची कफलिंकची जोडी होती. यासाठी त्यांनी केवळ 7.6 दशलक्ष रुपये जमा केले होते. जानेवारी 2016 मध्ये हा व्यवहार केला. याशिवाय, त्यांची पत्नी कुलसूम नवाज यांनी 10.8 दशलक्ष रुपये देऊन 12.7 दशलक्ष रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट तसेच 41.6 दशलक्ष रुपये किमतीचा हार आणि कानातले खरेदी केले. फेब्रुवारी 2016 मध्ये, नवाझ शरीफ यांनी 3.2 दशलक्ष रुपये जमा करून 3.2 दशलक्ष किमतीचे डेला कोर्ट घड्याळ, 8 दशलक्ष रुपये किमतीची अंगठी आणि 5 दशलक्ष रुपये किमतीची कफलिंकची जोडी खरेदी केली. मार्च 2017 मध्ये त्यांचा मुलगा हुसैन नवाझ यांनी 1 लाख 86 हजार रुपये देऊन 9.4 लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ विकत घेतले. मे 2017 मध्ये नवाझ शरीफ यांनी ने 40 लाख रुपयांच्या रोलेक्स घड्याळासाठी फक्त 8 लाख 8 हजार रुपये दिले.

अवघ्या दोन कोटीत घेतल्या मौल्यवान वस्तू
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ८.५ कोटी पाकिस्तानी रुपये किमतीचे हिरेजडीत सोन्याचे घड्याळ मिळाले होते. याशिवाय 56 लाख किमतीचे कफलिंक, 15 लाख रुपये किमतीचे पेन आणि 85 लाख रुपये किमतीची अंगठी मिळाली होती. त्या बदल्यात इम्रान खान यांनी केवळ दोन कोटी रुपये जमा केले आणि या सर्व भेटवस्तू आपल्या नावावर करून घेतल्या. त्याने इतर अनेक भेटवस्तू घेताना त्याचे पैसेही दिले नाहीत.

झरदारींचा गाड्यांचा शौक
माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी 5.7 कोटी रुपयांची बीएमडब्ल्यू 760 Li कार आणि 5 कोटी रुपयांची टोयोटा लेक्सस LX 470 कार कमी किमतीत खरेदी केली. रेकॉर्डनुसार, त्यांनी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंच्या बदल्यात केवळ 1.6 कोटी रुपये जमा केले. याशिवाय, 2.7 कोटी रुपयांची आणखी एक कार अवघ्या 40 लाख रुपयांना त्यांनी खरेदी केली.

10 लाखांचे घड्याळ अवघे दीड लाखांत
मार्च 2011 मध्ये, त्याने 10 लाख रुपयांचे घड्याळ आणि इतर काही मौल्यवान वस्तू 1 लाख 58 हजार 250 रुपये भरून खरेदी केल्या. जून 2011 मध्ये, त्यांनी एकूण 1 लाख 89 हजार 219 रुपये देऊन साडेबारा लाख रुपयांचे कोरम मनगटी घड्याळ आपल्याकडे ठेवली. ऑक्टोबर 2011मध्ये दहा लाख रुपये किमतीचे आणखी एक कार्टियर मनगटी घड्याळ आणि एक एके-47 असॉल्ट रायफल केवळ 3 लाख 21 हजार रुपये देऊन त्यांनी खरेदी केले.

राष्ट्रपती अल्वींचाही व्यवहार वादाच्या भोवऱ्यात
राष्ट्रपती डॉ. आरिफ अल्वी यांच्या पत्नी समीना अल्वी यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये 8 लाख 65 हजार रुपये भरून 11.9 लाखाचा नेकलेस व अन्य दागिने खरेदी केले. फेब्रुवारी 2022 मध्ये, राष्ट्रपतींनी 1.2 कोटी रुपये भरून 2.5 कोटी रुपयांचे रोलेक्स मनगटी घड्याळ खरेदी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -