Alcohol Consumption : अलाहाबाद : जोपर्यंत पत्नी दारूच्या नशेत काही वेडंवाकडं वागत नाही तोवर पत्नी दारू पिते ही क्रूरता असू शकत नाही, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या पती आणि पत्नीमधील वाद उच्च न्यायालयापर्यंत गेले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने वेगळ्या कारणावरून पती – पत्नीचा घटस्फोट मंजूर केला. आपापसातील वादामुळे घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात गेलेल्या या पतीला घटस्फोट तर मिळाला पण न्यायालयाने चार खडे बोलही सुनावले. न्या. विवेक चौधरी आणि न्या. ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.(allahabad high court says alcohol consumption of wife is not cruelty divorce case)
पतीची तक्रार होती की, पत्नी त्याला न सांगता आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत बाहेर जाते आणि दारू पिते. यावर न्यायालयाने म्हटले की, जर मद्यपान केल्यानंतर काहीही वेडंवाकडं वागलं जात नसेल तर दारू पिणे ही क्रूरता नाही. आजही मध्यमवर्गीय समाजात दारू पिणे निषिद्ध मानले जात असले आणि तो आपल्या संस्कृतीचा हिस्सा नसला तरी हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत, ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की, पत्नीने दारू प्यायल्याने पतीसोबत काही अनुचित घडले आहे.
हेही वाचा – Indian Student In Canada : धक्कादायक! कॅनडात शिकण्यासाठी गेलेले 20 हजार भारतीय विद्यार्थी गायब, काय आहे कारण
घटस्फोट मिळावा यासाठी पती न्यायालयात गेला होता. त्याच आधारे न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत होते. क्रूरता आणि परित्याग या दोन गोष्टींच्या आधारे न्यायालयात याची सुनावणी सुरू होती. मात्र, या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगवेगळ्या असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे.
क्रूरतेबाबत न्यायालयाचे म्हणणे होते की, अशी कोणतीही परिस्थिती किंवा पुरावा नाही ज्यामुळे हे सिद्ध होईल की, दारू पिणे ही क्रूरता आहे. कौटुंबिक न्यायालयाची निरीक्षणे देखील योग्य आहेत. लग्नानंतर या जोडप्याला झालेले मूल हे दारू प्यायल्यामुळे अशक्त आहे किंवा आजारी आहे तसेच पत्नीला गर्भारपणात, प्रसूतीवेळी काही अडचणी आल्या हे कुठेही सिद्ध होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच पत्नीला येणारे फोन हे तिच्या पुरूष मित्रांचेच होते, हे सांगणारे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे पतीसोबत क्रूरता होते आहे, हे पती सिद्ध करू शकत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
दरम्यान, या प्रकरणात 2016 पासून ही पत्नी पतीपासून वेगळी राहते आहे. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यानुसार हा घटस्फोटच असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. या खटल्यात पत्नीचा सहभाग फार नाही. थोडक्यात, तिचीही सासरी परतण्याची इच्छा नाही. यामुळे न्यायालयाने पतीची मागणी मान्य करत या दोघांच्या घटस्फोटाला मान्यता दिली.
हेही वाचा – Marathi School : विकासकासाठी मराठी शाळा बंद पडू देणार नाही, आदित्य ठाकरे कडाडले
हे दोघे मॅट्रिमोनिअल साईटवर भेटले आणि मग 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. पतीच्या याचिकेनुसार, पत्नी त्यांच्या मुलासोबत 2016 पासून कोलकात्यात वेगळी राहते. त्यानंतर त्याने कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. तिथे त्याची याचिका फेटाळली गेली.