सट्ट्यासाठी घेतला बायको आणि तीन चिमुरड्या मुलींचा जीव

उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये एका इसमाने सट्ट्यासाठी पत्नी आणि तीन चिमुरड्या मुलींची हत्या केली आहे. हत्येनंतर पत्नी व मुलींचे मृतदेह फ्रीज, कपाट आणि सुटकेसमध्ये ठेवले. त्यानंतर त्याने स्वत:देखील आत्महत्या केली.

murder
(फोटो प्रातिनिधिकआहे)

उत्तर प्रदेशमधील अलाहाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोज कुशवाह (वय ३५) या इसमाने सट्ट्यासाठी त्याची पत्नी आणि तीन लहानग्या मुलींची हत्या केली आहे. कुटुंबियांच्या हत्येनंतर त्याने स्वत:देखील गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी याबाबत सांगितले आहे की, या चारही हत्या आणि आत्महत्या २० ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. २० ऑगस्टच्या दिवशी दुपारपासून कुशवाह यांचा दरवाजा बंद असल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मनात शंका उपस्थित झाली. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबत पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कुशवाह यांच्या घराचा बंद दरवाजा तोडला. पोलिसांना सर्वप्रथम मनोज कुशवाह याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर घरामधल्या फ्रिजमध्ये मनोजची पत्नी श्वेता (वय ३०) हिचा मृतदेह आढळला. दांपत्यांची मोठी मुलगी प्रीती (वय ८) हिचा मृतदेह कपाटात सापडला तर मधली मुलगी शिवानी (वय ६) हिचा मृतदेह सुटकेसमध्ये आणि सर्वात धाकटी मुलगी श्रेया (वय 3) हिचा मृतदेह जमिनीवर पडलेला पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मनोजने पत्नी आणि मुलींची हत्या करून स्वत: आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सट्टा लावण्यासाठी घेतले सावकारी कर्ज

कुशवाह यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, मनोज सट्टा खेळायचा. सट्टा लावण्यासाठी त्याने सावकारी कर्ज घेतले होते. मनोजच्या डोक्यावरील कर्ज वाढत गेले व तो त्याच्या ओझ्याखाली आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मनोज तणावात होता. तसेच तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे समजू शकले नाही की, कुशवाह कुटुंब आर्थिक अडचणीत होते. त्यामुळे पैशांसाठी या हत्या केल्या असतील असे म्हणता येणार नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.