फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैरला जामीन मंजूर, पण जेलमधून सुटका नाही

उत्तर प्रदेशच्या सीतापुर येथे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणी जुबैर यांना पाच दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

mohammad jubair

ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक आणि फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांच्या याचिकेवर आज सर्वेाच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या सीतापुर येथे दाखल करण्यात आलेल्या प्रकरणी जुबैर यांना पाच दिवसांचा जामीन मंजूर केला. पण जामीन मिळूनही जुबैर यांची जेलमधून सुटका होणार नाही. सध्या ते दिल्ली पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश इंदीरा बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांना नोटीस बजावली होती. त्यात जुबैर यांना अटी आणि शर्थींवर जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे म्हटले होते. न्यायालयीन सूचनांनुसार जुबैर यांना न्यायालयिन क्षेत्राबाहेर जाता येणार नाही. तसेच याप्रकरणावर अंतरिम सुनावणी होईपर्यंत त्यांना कसलेही टि्वट करता येणार नाही असे म्हटले होते.

मोहम्मद जुबैर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले . यावेळी न्यायालयाला केलेल्या याचिकेत जुबैर यांनी धार्मिक भावनांचा अनादर केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यादाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. जुबैर यांनी अलाहाबाद न्यायालयात रिट याचिका केली होती. ती न्यायालयाने १३ जूनला फेटाळून लावली. त्यानंतर जुबैर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.