Eco friendly bappa Competition
घर क्राइम दुखापत गंभीर स्वरुपाची नसली तरी, हत्येच्या प्रयत्नाचा आरोपी दोषीच - सुप्रीम कोर्ट

दुखापत गंभीर स्वरुपाची नसली तरी, हत्येच्या प्रयत्नाचा आरोपी दोषीच – सुप्रीम कोर्ट

Subscribe

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीला झालेली दुखापत गंभीर नसून अगदी साध्या स्वरूपाची असली तरीही भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 307अंतर्गत आरोपीची शिक्षा कायम ठेवता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाने एका आरोपीविरोधात दिलेला निर्णय गुन्ह्यामागील हेतू ध्यानी घेऊन सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.

हेही वाचा – कोटात पाच तासांमध्ये दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या; पेपर देताच लातूरच्या विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

- Advertisement -

नांदेडमधील एका कुख्यात गुंडाने पोलीस कॉन्स्टेबलवर गुप्तीने हल्ला केला होता. त्याने कॉन्स्टेबलच्या डोक्यात गुप्ती मारण्याचा प्रयत्न केला, पण ती वाचवताना पोलिसाच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. याप्रकरणात आरोपीला आयपीसीच्या कलम 307 आणि 332 अंतर्गत गुन्ह्यांसाठी एकाच वेळी दोषी ठरविण्यात आले. या गुन्ह्यांसाठी सत्र न्यायालयाने त्याला अनुक्रमे पाच वर्षे आणि दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याविरोधात त्याने औरंगाबाद खंडपीठाकडे अपील केले होते. पण खंडपीठाने ते फेटाळल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

याप्रकरणी संबंधित गुंडाविरोधात निकाल केला असला तरी, तक्रारदाराला (पोलीस) झालेल्या जखमा अतिशय साध्या स्वरूपाच्या होत्या आणि ते आयपीसीच्या कलम 307नुसार गुन्हा ठरणार नाहीत, असा युक्तिवाद या गुंडाच्या वतीने करण्यात आला. मात्र, न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. केवळ तक्रारदाराला झालेल्या जखमा अतिशय साध्या स्वरूपाच्या असल्याचे कारण देऊन, आयपीसीच्या कलम 307अंतर्गत गुन्ह्यासाठी अपीलकर्त्याला दोषमुक्त करता येणार नाही. कारण आरोपीच्या या कृ्त्यामागील हेतूही महत्त्वाचा आहे, असे न्यायालयाने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवार गटाला चिन्हही मिळणार; प्रफुल्ल पटेल यांनी दावा करताना तारीखही सांगितली

या प्रकरणात, अपीलकर्त्याने फिर्यादीवर गुप्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तोही त्याच्या डोक्यावर, हे ठोस पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. मात्र, डोक्यावरील वार टाळताना फिर्यादीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. आरोपीचे हे कृत्य आयपीसीच्या कलम 307अंतर्गत दंडनीय गुन्ह्याखाली समाविष्ट केले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नेमके प्रकरण काय?
सन 1995मध्ये नांदेडच्या इतवारा परिसरात एस. के. खाजा हा गुंड लोकांना धमकावून खंडणी मागत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. 11 मार्च 1995 रोजी आरोपी रामरहिम नगरमध्ये असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल मोहम्मद खान पठाण यांच्यासह अन्य पोलीस तिथे पोहोचले. पण त्यांना पाहून खाजाने पळून जायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्याला ताब्यात घेत असतानाच, त्याने गुप्तीने हे़डकॉन्स्टेबल पठाण याच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला, पण पठाण यांनी तो चुकवला. यात त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली.

हेही वाचा – ‘तेवढे’ बळ अजित पवार यांच्यात आहे काय? ठाकरे गटाचा बोचरा सवाल

अतिरिक्त सत्र न्यायालयाने 31 मार्च 1999 रोजी त्याला आयपीसीच्या कलम 307 आणि 332 अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून अनुक्रमे पाच वर्षे आणि दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला त्याने औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिले. मात्र, 7 जानेवारी 2011 रोजी न्यायालयाने हे अपील फेटाळून लावताना त्याची शिक्षा कायम ठेवली होती.

- Advertisment -