अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनच्या स्पाय बलूनचे सत्य उघड

चीनकडून आकाशात सोडण्यात आलेला स्पाय बलून अमेरिकेकडून फोडण्यात आला आहे. त्यानंतर या स्पाय बलूनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्पाय बलूनद्वारे चीन इतर देशांसह भारताची देखील हेरगिरी करत असल्याचे अमेरिकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे.

America has revealed the truth about China's spy balloon

चीनच्या स्पाय बलूनमुळे सर्वच देशांना पुन्हा एकदा सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अमेरिकेने क्षेपणास्त्रांचा मारा करत आकाशातील चीनचा स्पाय बलून पाडला. अमेरिकेच्या नौदलाला या फुग्याचे काही अवशेष अमेरिकेच्या अटलांटिक महासागरता सापडले. याबाबतचा एक अहवाल अमेरिकेकडून सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार केवळ अमेरिकाच नाही तर चीनकडून भारत आणि जपानसह अनेक देशांची हेरगिरी करण्यात येत आहे. भारतासह अनेक देशांना लक्ष्य करताना चीनने स्पाय बलून आकाशात सोडून या देशांची लष्करी माहिती गोळा केल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीनला ज्या देशांबाबत माहिती जाणून घेण्याची सर्वाधिक गरज वाटतेय अशा देशांची हेरगिरी करण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मी स्पाय फुग्यांचा वापर करते, असे या अहवालात म्हटले आहे.

चीन कोणत्या देशांची हेरगिरी करत आहे?
वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनच्या दक्षिण किनाऱ्यापासून दूर असलेल्या हैनान प्रांतात गेल्या काही दिवसांपासून अनेक स्पाय बलून आकाशात दिसत आहेत. या फुग्यांमधून जपान, भारत, व्हिएतनाम, तैवान आणि फिलीपिन्स आदी देशांची माहिती संकलित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वॉशिंग्टन पोस्टने अनेक माजी संरक्षण आणि गुप्तचर अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वृत्त दिले आहे. गेल्या काही महिन्यांत हवाई, फ्लोरिडा, टेक्सास आणि ग्वाममध्ये किमान चार स्पाय बलून दिसल्याचे या अहवालाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.

अमेरिकेने 40 दूतावासांना दिला सावध राहण्याचा सल्ला
अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शर्मन यांनी चीनच्या स्पाय बलूनला लक्ष्य केल्यानंतर 40 दूतावासातील 150 अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. अमेरिकेने काही देशांना धोक्यांचा इशारा दिला आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनचा गुप्तचर फुगा फोडला असल्याची माहिती दिली होती. यानंतर अमेरिकेच्या वायुसेनेने हायटेक F-22 रॅप्टर विमानाच्या मदतीने चिनी स्पाय बलून फोडला. तीन बसेसच्या आकाराचा हा फुगा फोडल्यानंतर कोणालाही इजा होऊ नये म्हणून हा फुगा अटलांटिक महासागरावर येण्यापर्यंतची वाट पाहण्यात आली.

हेही वाचा – माणुसकी अजूनही जिवंत आहे…; तुर्की महिलेने भारतीय लष्करी अधिकाऱ्याला मिठी मारतानाचा VIDEO VIRAL

चीनने यापूर्वी केली आहे भारताची हेरगिरी
अलीकडेच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हेरगिरीच्या आरोपाखाली दोघांना अटक केली होती. दोन्ही चिनी नागरिक नोकरीच्या बहाण्याने येथे आले होते. ते भारताची संवेदनशील माहिती चीनला पाठवत होते. गुप्तचर यंत्रणा बराच काळ या दोन्ही आरोपींवर लक्ष ठेवून होत्या, अशी माहिती त्यावेळी पोलिसांकडून देण्यात आलेली.