घरताज्या घडामोडीडोनाल्ड ट्रम्पनी काढलं भारताचं खुसपट; म्हणे, 'भारत काळजी घेत नाही'!

डोनाल्ड ट्रम्पनी काढलं भारताचं खुसपट; म्हणे, ‘भारत काळजी घेत नाही’!

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येऊन गेल्यापासून त्यांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सुमधुर मैत्रीपूर्ण सौहार्द सगळ्यांच्याच लक्षात राहिला आहे. अमेरिका आणि भारत किती जवळचे मित्र आहेत, भारत किती महान देश आहे, भारतीय संस्कृतीचा मी किती आदर करतो, मला भारतीय संस्कृती आणि भारतीयांचा किती अभिमान आहे असे कौतुकाचे मोठमोठाले डोंगर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतात केलेल्या भाषणात उभे केला. त्यामुळे त्यांच्या या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या मैत्रीची सुरुवातच होणार आहे, असं सगळ्यांना वाटू लागलं. पण आता त्याच ट्रम्प यांनी भारताचं खुसपट काढत टीका केली आहे. भारत काळजी घेत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. टेक्सासमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोना काळात अमेरिकेच्या मागणीवर भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (hydroxychloroquine) गोळ्यांचा मोठा पुरवठा अमेरिकेला केला. त्यामुळे भारत अमेरिकेच्या हाकेला ओ देऊन लागलीच मदत करत असल्याचं आख्ख्या जगानं पाहिलं. पण कोरोना लसीच्या बाबतीत मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी लस आल्यानंतर सर्वात आधी साठा अमेरिकेत उपलब्ध करून दिला जाईल, असं जाहीर केलं. आणि आता पुन्हा एकदा ऊर्जाविषयक संवादात बोलताना भारतावर टीका केली. याबाबतीत त्यांनी भारताला थेट चीन आणि रशियाच्या रांगेत नेऊन बसवलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

जगभरात वातावरणावर चर्चा आणि चिंता सुरू होत असताना आता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासंदर्भात स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला सुरुवात केली आहे. ‘भारत, चीन आणि रशिया त्यांच्या हवेची काळजी घेत नाहीत. पण अमेरिका घेते. चीन्यांना वाटतं की अमेरिकनांनी आपल्या हवेची काळजी (Air Quality) घेतली पाहिजे. पण भारत, चीन, रशिया हेच काळजी घेत नाहीत. जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे, तोपर्यंत अमेरिकेचं हित हे सर्वाधिक प्राधान्याचं असेल. अनेक वर्ष आपण इतर देशांना प्राधान्य देऊन त्यांच्या भल्याचा विचार करत राहिलो. पण आता तसं होणार नाही’, असं ट्रम्प म्हणाले आहेत. ‘अमेरिकेच्या जीवनमानाविषयी अजिबात आदर नाही. पण अमेरिकेसारखं महान जीवनमान-राहणीमान जगात कुठलंही नाही’, असं देखील ते म्हणाले.

भारत चौथ्या स्थानावर!

जगभरात सर्वाधिक कार्बनडाय ऑक्साईडचं उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. २०१७च्या आकडेवारीचा विचार केला, तर भारतात उत्सर्जन होणाऱ्या कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण जगाच्या ७ टक्के इतकं होतं. ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या २०१८च्या अहवालात यासंदर्भातली आकडेवारी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर चीन (२७ टक्के), दुसऱ्या स्थानावर अमेरिका (१५ टक्के) आणि तिसऱ्या स्थानावर युरोप (१० टक्के) आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -