
वॉशिंग्टन : पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशातच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या दावेदार निक्की हेली यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे पाकिस्तानची चिंता वाढणार आहे. सत्तेत आल्यास पाकिस्तानसारख्या वाईट देशांना आर्थिक मदत देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय-अमेरिकन नेत्या निक्की हेली या रिपब्लिकन पक्षाकडून दावेदार आहेत.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. परकीय चलनाचा साठा 3 अब्ज डॉलरपेक्षा कमी आहे. इतर काही देशांप्रमाणेच अमेरिकेकडून पाकिस्तानला अर्थसहाय्य मिळत होते. पण या सर्व देशांनी हळूहळू हात आखडता घेतला आहे. देशाला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी पाकिस्तान अमेरिकन डॉलर्स मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर निक्की हेली यांनी पाकिस्तानला झटका दिला आहे.
A weak America pays the bad guys: Hundreds of millions to Pakistan, Iraq, and Zimbabwe last year alone.
A strong America won’t be the world’s ATM.
— Nikki Haley (@NikkiHaley) February 28, 2023
दक्षिण कॅरोलिनाच्या दोन वेळा गव्हर्नर राहिलेल्या हेली यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे. आर्थिक मंदीसदृश स्थिती असतानाही अमेरिका वाईट देशांना आर्थिक मदत करते. अमेरिकेने गेल्या वर्षी पाकिस्तान, इराक आणि झिम्बाब्वेला लाखो डॉलर्स दिले. अमेरिका हे जगभरातील देशांचे एटीएम होणार नाही. राष्ट्राध्यक्ष या नात्याने आम्ही आमचे परराष्ट्र धोरण योग्य राहील याची काळजी घेऊ. आमच्या योजना आमच्या शत्रूंना पैसे पाठवणाऱ्यांसाठी नसणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जे देश आमचा द्वेष करतात, त्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत मी जास्तीत जास्त कपात करेन. आमच्या लोकांच्या कष्टाचा पैसा आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे हेली यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी न्यूयॉर्क पोस्टमधील लेखातही हीच भूमिका मांडली आहे. अमेरिकेने गेल्या वर्षी परदेशी मदतीसाठी 46 अब्ज डॉलर्स खर्च केले. ही मदत चीन, पाकिस्तान आणि इराकसारख्या देशांमध्ये गेली. हा पैसा कुठे जात आहे, हे जाणून घेण्याचा अमेरिकन करदात्यांना अधिकार आहे, असे त्यांनी त्यात म्हटले आहे.
बायडेन प्रशासनाने पाकिस्तानला लष्करी मदत पुन्हा सुरू केली आहे. देशात किमान डझनभर दहशतवादी संघटना आहेत आणि तेथील सरकारचे चीनशी घनिष्ठ संबंध आहेत, असे सांगत निक्की हेली यांनी, पाकिस्तानच्या लष्करी मदतीत कपात करण्याच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या देशाने अमेरिकन सैनिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. ट्रम्प यांचा तो निर्णय म्हणजे आमच्या सैनिकांसाठी, आमच्या करदात्यांना आणि आमच्या महत्वाच्या हितचिंतकांसाठी हा एक मोठा विजय होता. पण आम्ही अजूनही त्यांना इतर मदत देत आहोत. राष्ट्राध्यक्ष या नात्याने मी प्रत्येक पैसा रोखेन, असे त्यांनी म्हटले आहे.