घरताज्या घडामोडीअखेर अमित शहांनी दिली जाहीर कबुली.. 'असं करायला नको होतं'!

अखेर अमित शहांनी दिली जाहीर कबुली.. ‘असं करायला नको होतं’!

Subscribe

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व ताकद पणाला लावून देखील भाजपला अपेक्षित यश मिळवण्यात अपयश आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी एका कार्यक्रमात जाहीर कबुली दिली आहे.

देशभरात सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच दिल्लीच्या शाहीन बाग परिसरातील मुस्लीम महिला आंदोलकांचा मुद्दा तापू लागलेला असतानाच दिल्लीतील विधानसभा निवडणुका लागल्यामुळे भाजपची कोंडी झाली. वातावरण केंद्रसरकार आणि पर्यायाने भाजपविरोधी असताना दिल्लीसारख्या महत्त्वाच्या राज्यातल्या निवडणुकांचा सामना करण्यात भाजपसाठी मोठी जोखीम होती आणि अखेर त्याचे अपेक्षित परिणाम दिसून आले. आम आदमी पक्षाने ६२ जागांवर विजय मिळव पुन्हा एकदा दिल्लीत आपच्या सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब केलं, तर भाजपला मोठा फौजफाटा दिल्लीत डेरेदाखल करून देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ५ जागा वाढून अवघ्या ८ जागांवर समाधान मानावं लागलं. यासंदर्भात अखेर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर कबुली दिली आहे.

‘होय, मी स्वीकार करतो’

टाईम्स नाऊ समिटमध्ये सहभागी झालेल्या अमित शहांनी याच कार्यक्रमात ही जाहीर कबुली दिली आहे. यावेळी बोलताना अमित शहांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांमधला भाजपचा पराभव स्वीकार केला. अमित शहा म्हणाले, ‘दिल्ली निवडणुकांमध्ये झालेला आमचा पराभव मी स्वीकार करतो. ‘देश के गद्दारों को, गोली मारो सालों को’, या प्रकारची वक्तव्य भाजपच्या नेत्यांनी करायला नको होती. निवडणुकीत कदाचित आम्हाला त्याचा फटका बसला असेल’. दरम्यान, यावेळी अमित शहांनी सीएएबद्दल देखील भूमिका मांडली. ‘सीएएमुळे भाजपचा दिल्लीत पराभव झालेला नाही. ज्याला कुणाला सीएएविषयी माझ्याशी बोलायचं आहे, त्याला मी तीन दिवसांत भेटीची वेळ देईन’, असं जाहीर आव्हान देखील अमित शहांनी यावेळी केलं.

- Advertisement -

दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार करताना भाजपचे अनुराग ठाकूर आणि परवेश मिश्रा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. तसेच, शाहीन बागमधील आंदोलकांविषयी ही टीका करण्यात आल्यामुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणावर भाजपविरोधी वातावरण तयार झालं होतं.


Video: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं खळबळजनक वक्तव्य
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -