‘अमित शाह नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपाचे सरकार आणणार’ या राजकीय वक्तव्यामुळे त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यावर पुन्हा एकदा विरोधकांडून टीकेची झोड उठवली जात आहे. अमित शाह आंतरराष्ट्रीय स्तरावरही भाजपाचे सरकार स्थापन करेल असा बिप्लब कुमार देब यांचा दावा आहे. त्रिपुराची राजधानी असलेल्या अगरतलातील भाजपाच्या एका कार्यक्रमात बिप्लब कुमार देब बोलत होते. यावेळी बोलताना, ”भारतीय जनता पार्टी केवळ देशभरातच नाही तर शेजारील देशांमध्येही विस्तारित करण्याची योजना आखत आहे. गृहमंत्री अमित शाह नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये भाजपा सरकार स्थापन करण्याची योजना आखत असल्याचे बिप्लब देब (Biplab Kumar Deb) म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री बिप्लब यांनी २०१८ मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच्या चर्चेची आठवण करुन दिली. याविषयी बोलताना बिप्लब म्हणाले, ज्यावेळी अमित शाह भाजपाचे प्रमुख होते त्यावेळी त्यांनी भारतातील सर्व राज्यांमध्ये भाजपाला विजय मिळून दिल्यानंतर विदेशातही भाजपाची सत्ता स्थापन करणार अशी चर्चा झाली होती. २०१८ मध्ये अतिथीगृहावर विदेशात भाजपाचे सरकार स्थापन करण्याच्या विषयावर आमची चर्चा झाली. यावेळी अजय जम्वाल (भाजपाचे उत्तर-पूर्व जोनल सचिव) यांनी सांगितले की, भाजपाने देशातील अनेक राज्यात आपले सरकार स्थापन केले. तर यावर उत्तर देत अमित शाह म्हणाले, आता श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहे. आपल्याला आता पक्षाचा विस्तार आणखी वाढवायचा आहे. त्यामुळे श्रीलंका आणि नेपाळमध्ये सरकार बनवण्याच्या योजनासाठी पावले उचलावी लागणार आहेत.