मुंबई : देशात सध्या विविध मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. त्याशिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चा रंगली आहे. पण देशात सध्या सर्वाधिक चर्चा होतेय ती एक देश, एक निवडणुकीच्या संदर्भातील. कारण देशात भविष्यात एक देश एक निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश देखील केंद्राकडून काढण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय संसदेचे विशेष अधिवेशन हे 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. याच विशेष अधिवेशनाच्या मुद्द्यावरून आणि भाजपकडून निवडणुकीसाठी जी रणनिती आखण्यात येते त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून टीका करण्यात आली आहे. (Amol Kolhe criticism of BJP election strategy)
हेही वाचा – ‘त्या’ फोटोची तयारी सुरू, लोकसभा होणार विसर्जित? अमोल कोल्हेंचा दावा, म्हणाले…
खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी ‘ONE NATION ONE ELECTION’ बाबत भाष्य केले आहे. भाजपकडून वेळेआधी निवडणुका घेण्याचा अट्टहास करण्यात येत आहे कारण मोदी ब्रँडची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे याची आता भाजपला भिती वाटू लागली असल्याचे अमोल कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अमोल कोल्हे म्हणाले की, मोदी सरकार संसद विसर्जित करून मुदतपूर्व निवडणुका घेऊ शकते. कारण 2014पासून सर्व निवडणुकांमध्ये भाजपाच्या प्रचाराचा हुकमी एक्का मोदीच राहिले आहेत. पण गेल्या काही दिवसांत या मोदी ब्रँडची लोकप्रियता किंवा करिष्मा ओसरताना आपण पाहातो आहोत. मग अविश्वास ठरावावरचे मोदींचं भाषण असो किंवा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरचे त्यांचे भाषण असो.
तसेच, नोव्हेंबर महिन्यात मिझोराम, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. निवडणूकपूर्व कल पाहिले, तर छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणा या चारही राज्यांत भाजपा सत्तेत येण्याची सुतराम शक्यता नाही. जर पराभव झाला तर तो भाजपाचा होईल. मग माध्यमांसमोर चेहरा येतो तो राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा. पण विजय झाला तर मात्र मोदींचा ही रणनीती लोकांनी पुरेपूर ओळखली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा पराभव चार राज्यांत झाला तर मोदी ब्रँडचा प्रभाव ओसरू लागल्यावर शिक्कामोर्तब होईल. ही भावना संपूर्ण देशात निर्माण होईल याची भीती भाजपाला वाटतेय, अशी टीका अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.
‘एक देश, एक निवडणूक’ ही भारतीय जनता पक्षाची अपरिहार्यता आहे की चाल❓
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या ‘अमोलतेअनमोल’ युट्युब चॅनेलला नक्की भेट द्या!
लिंक – https://t.co/01OGh4eyWa#OneNationOneElection #OneNationOnePoll #ElectionCommissionofIndia #AmolKolhe #AmolTeAnmol… pic.twitter.com/e9fGh1J18o
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 8, 2023
जुलै महिन्यातही मणिपूर पेटलेले असताना मोदींनी कर्नाटक प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. पण तरीही कर्नाटकमध्ये भाजपाचा दारूण पराभव झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी घरगुती गॅसवर 200 रुपयांची सवलत देण्याचे ट्रम्पकार्ड मोदींनी खेळून पाहिले. पण हा डावही फसला. 9 वर्षांत सिलेंडरमागे 700-750 रुपयांची भाववाढ वसूल केल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर 200 रुपयांची सवलत म्हणजे चुनावी जुमला आहे हे जनतेने पुरेपूर ओळखले आहे, असेही कोल्हे यांच्याकडून त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.
2019 ते 2023 या परिस्थितीत खूप बदल झाला आहे. महागाई, बेरोजगारी यावर मोदी सरकारकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, विखारी सामाजिक वातावरण, बेभरवशाचे निर्यात धोरण, शेतकऱ्यांचे नुकसान, योजनांमधले अपयश व अच्छे दिन जनतेच्या दृष्टीक्षेपात न येणे ही मोदी सरकारची डोकेदुखी आहे, अशी जळजळीत टीका अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.