अमृतपालसिंग आत्मसमर्पण करण्यास तयार; व्हिडिओ शेअर करत पोलिसांसमोर ठेवल्या तीन अटी

नवी दिल्ली : फरार खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी पंजाब पोलीस आणि इतर यंत्रणांनी तपास मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान, अमृतपाल सिंगने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृतपाल सिंगला पंजाबमध्ये राहून आत्मसमर्पण करायचे असून त्याने पोलिसांसमोर तीन अटी ठेवल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

व्हिडीओ समोर आल्यानंतर पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग ज्या ठिकाणी लपण्याची शक्यता जास्त आहे त्या ठिकाणी छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अमृतपालचा व्हिडिओ दोन दिवस जुना दिसत असून तो परदेशातून अपलोड करण्यात आला आहे. ज्या हँडलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे ते यूकेचे आहे. व्हिडिओ ज्या यूट्यूब अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला होता, त्यावर सरकारने बंदी घातली आहे.

 पोलिसांसमोर अमृतपालने तीन अटी ठेवल्या
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये अमृतपालने सांगितले की, “जर पंजाब सरकारचा मला अटक करायचे असते तर पोलीस माझ्या घरी आले असते आणि मी ते त्यांच्या सोबत गेलो असतो.” याशिवाय पंजाब पोलिसांवरही टीका केली आहे. याशिवाय अमृतपालने पोलिसांसमोर तीन अटीही ठेवल्या आहेत. त्याने अटींमध्ये म्हटेल की, पोलिसांनी अटक केल्यास शरण आलो असे दाखवावे. मला पंजाबच्या तुरुंगात ठेवावे आणि तुरुंगात मारहाण करू नये.

अमृतपाल सिंग याचा घटनाक्रम
18 मार्च रोजी फरार झालेल्या अमृतपाल सिंगने आतापर्यंत अनेक वाहने आणि कपडे बदलले आहेत. तो मर्सिडीजमध्ये पळून गेला, त्यानंतर तो ब्रेझा कारमध्ये दिसला. त्याने गावातील गुरुद्वाराचे पुजारी आणि त्याच्या कुटुंबीयांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले आणि नंतर तरुणाचे कपडे घेऊन पळ काढला. काही लोकांनी त्याला दुचाकी देण्यासाठी मदत केली. यानंतर तो एका मोटारीवर दिसला, ज्यावर त्याची दुचाकीही ठेवण्यात आली होती.
हरियाणा, यूपी आणि दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळ्या वेषात दिसला. त्याच्याकडून वापरण्यात आलेली बहुतांश वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. बुधवारी (२८ मार्च) पोलिसांनी उत्तराखंड नंबर प्लेट असलेली स्कॉर्पिओ कार जप्त केली, ज्यामध्ये अमृतपाल पंजाबला परतला होता.