नरेंद्र मोदी-शरद पवार यांच्यात तासभर चर्चा

काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने अस्तित्वात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, हे लक्षात घेता सहकारी साखर कारखाने, संस्था आणि बँक यावर या भेटीत बातचीत झाल्याचे बोलले जात आहे. या भेटीत राजकीय बातचीत सुद्धा झाल्याचे सांगितले जाते.

सहकार मंत्रालयाची धुरा गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती देण्यात आली असून काही दिवसांपूर्वी याच संदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सहकारी बँकांच्या अस्तित्वाचं आणि त्यांच्या सहकारी स्वरुपाचं संरक्षण केलं जावं, अशी मागणी केली होती. को – ऑपरेटिव्ह बँकांवर आरबीआयद्वारे नियंत्रण ठेवणं हा राज्याच्या अधिकारांत दखल देण्यासारखं आहे. को-ऑपरेटिव्ह बँका राज्य सरकारच्या अखत्यारित येतात, असेही पवारांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या या भेटीत देशातील कोरोना परिस्थितीवरही चर्चा झाल्याचे समजतंय. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्यावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. शरद पवार हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

राजकीय चर्चा झाली नाही- शरद पवार

‘ही अधिकृत भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या एका पत्रात आपण पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता’, असे शरद पवार यांनी म्हटलंय. ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाली’ असे शरद पवार यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटलं गेलंय.