
Anand Mahindra Tweet : आनंद महिंद्रा यांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखलं जातं. अनेकदा सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट्स लोकांना विचार करायला लावणारे असतात. आता तर त्यांनी थेट इशाराच दिलाय. “भारताविरूद्ध डाव खेळायची हिम्मतही करू नका” असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलंय. आनंद महिंद्रा असं नेमकं का म्हणाले आणि कुणाला म्हणाले? असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागले आहेत.
सध्या हिंडेनबर्ग रिचर्स रिपोर्टचा मुद्दा भारतीय व्यावसायिक जगतात चर्चेत आला आहे. या रिपोर्टमुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये खळबळ उडाली आहे. अदानी समूहासमोरही मोठं संकट निर्माण झालंय. अशा स्थितीत आता आनंद महिंद्रा हे गौतम अदानींच्या मदतीला धावून आले आहेत. भारत भविष्यात जगातील आर्थिक महासत्ता बनण्याबाबत जागतिक माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात आनंद महिंद्रा यांनी आपले वक्तव्य केले आहे.
भारताने खूप काही पाहिलंय…
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशाच्या व्यावसायिक क्षेत्रात सध्याच्या संकटाबाबत जागतिक माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे, या घटनेमुळे जागतिक आर्थिक शक्ती बनण्याचे भारताचे ध्येय कमकुवत होऊ देऊ नका. माझ्या देशाला मी भूकंप, दुष्काळ, नैराश्य, युद्धे आणि दहशतवादी हल्ले यातून जाताना पाहिलं आहे. मी एवढंच म्हणेन की ‘तुम्ही (ग्लोबल मीडिया) भारताला कधीही कमी लेखू नका’.
Global media is speculating whether current challenges in the business sector will trip India’s ambitions to be a global economic force. I’ve lived long enough to see us face earthquakes, droughts, recessions, wars, terror attacks. All I will say is: never, ever bet against India
— anand mahindra (@anandmahindra) February 4, 2023
हिंडेनबर्गने शेअर बाजार हादरवून टाकलं
अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने नुकताच संपूर्ण भारतीय शेअर बाजार हादरवला आहे. २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे की अदानी समूहाने त्यांच्या शेअरची किंमत वाढवली आहे. एवढेच नाही तर समूहाच्या अनेक कंपन्यांनी हिशोबात फसवणूक केली आहे. अदानी समूहाने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
पण त्याचा परिणाम अदानी समूहाच्या कंपन्यांवर स्पष्टपणे दिसून येतो. समूहातील काही कंपन्यांचे शेअर्स ५० टक्क्यांनी कोसळले आहेत. अदानी समूहाच्या बाजार भांडवलात $१२० बिलियनची घट झाली आहे. समूहाचे मालक गौतम अदानी, जे अलीकडे जगातील आणि आशियातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते, ते आता खूप मागे पडले आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2023 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर २०२२ मध्ये ते ६.८ टक्के होते.