माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध आणखी एक अटक वॉरंट जारी; अडचणी वाढण्याची शक्यता

the general public is facing inflation, petrol is Rs 150 a liter, inflation broke the record of 70 years In Pakistan

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीश आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध इस्लामाबाद सत्र न्यायालयाने आणखी एक अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे इम्रान खान याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.

इम्रान खान यांनी २० ऑगस्ट रोजी एफ-९ पार्कमधील एका रॅलीत न्यायदंडाधिकारी झेबा चौधरी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. इस्लामाबाद सत्र न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी तीन पानांचा निकाल जाहीर करताना, तसेच न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल इम्रान खान यांना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. इम्रान खान यांनी सुनावणीला हजर राहण्याऐवजी न्यायाधीशांसमोर हजर राहण्यापासून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात त्यांनी परवानगीही मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत त्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी इस्लामाबाद पोलीस इम्रान खान यांना अटक करण्यासाठी इस्लामाबादमधून लाहोरला दुसऱ्यांदा पोहोचले आहेत. त्यामुळे इम्रान खान यांना पुढील 24 तासांत कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता पाकिस्तानी मीडियाने वर्तविली आहे. इम्रान यांच्या नेतृत्वाखाली काल, सोमवारी त्यांच्या हजारो समर्थकांनी लाहोरमध्ये मोर्चा काढला होता. याप्रसंगी इम्रान यांच्या समर्थकांनी त्यांना दरबारात घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता.

दरम्यान माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरूद्ध आत्तापर्यंत दोन प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत. यामध्ये तोशाखाना प्रकरणी कोर्टात हजर न राहिल्याचे पहिले कारण आहे, तर गेल्या वर्षी 20 ऑगस्ट 2022 रोजी एका जाहीर सभेला संबोधित करताना महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी दुसरे अजामीनपात्र अटक वॉरंट इस्लामाबाद सत्र न्यायालयाने जारी केले आहे. त्यामुळे इम्रान यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.