नवी दिल्ली : चांद्रयान -3च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आपली पहिली सूर्य मोहीम ‘आदित्य-L1’ लाँच केली आहे. आज, शनिवारी सकाळी 11.50 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून भारताची पहिली सूर्य मोहीम ‘आदित्य-L1’ प्रक्षेपित करण्यात आली. भारताच्या या पहिल्या सौर मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.
Another milestone for @isro 🚀 !
India’s maiden solar mission, Aditya-L1 successfully launched from Sriharikota #AdityaL1 #AdityaL1Launch@isro pic.twitter.com/QsFyq3OGtK
— DD News (@DDNewslive) September 2, 2023
‘आदित्य-एल1’ यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हे यान अंतराळातील ‘लॅग्रेंज पॉइंट’ म्हणजेच एल-1 कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे. यानंतर हा उपग्रह 24 तास सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास करेल. श्रीहरीकोटा येथून हे यान पोलार सॅटेलाईटद्वारे (PSLV-C57) प्रक्षेपित करण्यात आले. ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हे यान प्रक्षेपित होताच नागरिकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
आदित्य मोहिमेतून सूर्याचा अभ्यास करणार
आदित्य-L1च्या प्रक्षेपणानंतर हा उपग्रह सुमारे चार महिने उंतराळात प्रवास करणार असून सूर्य आणि पृथ्वीमध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर आदित्य-L1 हा उपग्रह स्थापित होईल. ‘आदित्य-L1’ ही मोहीम केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरणार आहे. या मोहिमेद्वारे इस्रो मुख्यतः अंतराळातील सौरवादळे, तेथील तापमानवाढ आदी बाबींवर प्रकाश टाकणार आहे. अंतराळातील घडणार्या या बाबींचा परिणाम पृथ्वीवर कशाप्रकारे होणार असून यामुळे जीवसृष्टीला आगामी काळात कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे, या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
लँग्रेज पॉइंट म्हणजे काय?
आदित्य L1 हे यान सूर्याभोवतीच्या लॅग्रेंज पॉइंट 1च्या कक्षेत प्रवेश करेल आणि तिथून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत घालत आपला अभ्यास सुरू करेल. अंतराळातील तारे, ग्रह, उपग्रह इत्यादींमध्ये गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल म्हणजेच समसमान असते. अशा बिंदूंना खगोलशास्त्राज्ञांच्या भाषेत लँग्रेंज पॉइंट असे संबोधले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँग्रेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.