घरCORONA UPDATEअभिमानास्पद! डॉ. हर्षवर्धन यांची WHOच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

अभिमानास्पद! डॉ. हर्षवर्धन यांची WHOच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

Subscribe

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या लढ्यात भारताने केलेल्या कामाचं आणि उपाय योजनांचं कौतुक जागतिक स्तरावर केले जात आहे. याच दरम्यान भारतासाठी एक अभिमानाची बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार स्वीकारणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीन लाखांच्यावर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतात ही कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांच्यावर पोहोचला आहे. तसेच तीन हजाराहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

- Advertisement -

डॉ. हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी नकतानी यांच्या जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या ३४ सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं आहे. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तसेच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल, असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समूहाने सर्वांच्या सहमतीने घेतला होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांची निवड २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटामध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिले जाते. गेल्या वर्षी हे ठरविण्यात आले होते. येत्या शुक्रवारपासून यातील पाहिले वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष असणार आहे. या कार्यकारी मंडळाच्या वर्षांतून दोन बैठका होतात आणि यापैकी जानेवारी महिन्यात मुख्य बैठक होते. आरोग्य सभेनंतर त्वरित मे महिन्यात या मंडळाची एक बैठक होते. आरोग्य सभेच्या सर्व निर्णयांना आणि धोरणांना प्रभावी बनविण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळांच्या अध्यक्षांची असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -