आरे CEO च्या घरात सापडले साडेतीन कोटींचे घबाड

corruption cases investigation by ACB is stopped
प्रातिनिधिक फोटो

५० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आलेले आरे चे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांच्या घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे साडे तीन कोटी रुपयाची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. हि कारवाई मंगळवारी करण्यात आली असून नथू राठोड यांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असलेली संपत्तीची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीत राहणारे तक्रारदार यांच्या घराच्या दुरुस्तीसाठी परवानगी मिळावी म्हणून आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांची भेट घेतली होती. दरम्यान नथू राठोड यांनी तक्रारदार यांना शिपाई अरविंद तिवारी यांची भेट घेण्यास सांगितले होते. तक्रारदार यांनी शिपाई तिवारी याची भेट घेतली असता त्याने या कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अरविंद तिवारी याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.
शिपाई अरविंद तिवारी यांच्या चौकशीत लाचेची रक्कम आरे वसाहतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  नथू राठोड यांच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचे स्पष्ट होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी नथू राठोड आणि अरविंद तिवारी या दोघांविरुद्ध भ्रष्ट्राचार प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळावारी नथू राठोड यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ३ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांची रोकड मिळून आली. याबाबत रोकडबाबत चौकशी करण्यात आली असता नथू राठोड यांच्या घरातील सर्व रोकड बेहिशेबी असल्याचे समोर आले आले. लाचलूपचत प्रतिबंधक विभागाने हि रोकड ताब्यात घेऊन जप्त केली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्राच्या म्हणण्यानुसार नथू राठोड यांच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर असणारी मुंबई आणि गावाकडील संपत्तीची देखील चौकशी करण्यात येणार असून त्यांचे बँक खाते तपासण्यात येणार आहेत.