नवी दिल्ली : कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांची आता सहा दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांनी पत्नी सुनीता हिच्या माध्यमातून दिल्लीच्या नागरिकांना तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. दिल्लीतील माता-भगिनींना मंदिरात जाऊन आपल्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा – Arvind Kejriwal : ही कसली नैतिकता? केजरीवालांच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेत्याचा प्रश्न
सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी आत असो वा बाहेर, मी प्रत्येक क्षणी देशाची सेवा करत राहीन. माझे जीवन फक्त संघर्षासाठी आहे. आजपर्यंत मी खूप संघर्ष केला आहे आणि पुढेही सुरूच राहील. म्हणूनच माझ्या अटकेबद्दल मला आश्चर्य वाटत नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
देशवासियों के लिए जेल से अरविंद केजरीवाल का संदेश। https://t.co/Q9K6JjSjke
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 23, 2024
आपल्याला एकत्र येऊन भारताला पुन्हा एकदा महान बनवायचे आहे. भारताच्या आत आणि बाहेर अशा अनेक शक्ती आहेत, ज्या देशाला कमकुवत बनवत आहेत. सतर्क राहूनच आपल्याला त्यांचा पराभव केला पाहिजे, असेही केजरीवाल यांनी संदेशात म्हटले आहे.
केजरीवाल तुरुंगात गेल्याने आपल्याला 1000 रुपये मिळतील की नाही, असा विचार दिल्लीतील माता-भगिनी करत असतील. पण मी सर्वांना आवाहन करतो की, त्यांनी आपल्या भावावर आणि मुलावर विश्वास ठेवावा. मला आत ठेवू शकतील असा कोणताही तुरुंग नाही. मी लवकरच बाहेर येईन आणि माझे वचन पूर्ण करेन, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय मी तुरुंगात असलो तरी, समाजसेवेचे कार्य सुरूच राहू दे, असे आवाहन आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना करतानाच, भाजपवाल्यांचाही द्वेष करू नका; ते सर्व आपलेच भाऊ-बहिणी आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Loksabha 2024 : एकनाथ शिंदेंची अडचण होऊ नये म्हणून…; विजय शिवतारे लवकरच करणार मोठी घोषणा