घरदेश-विदेशArvind Kejriwal : ही कसली नैतिकता? केजरीवालांच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेत्याचा प्रश्न

Arvind Kejriwal : ही कसली नैतिकता? केजरीवालांच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेत्याचा प्रश्न

Subscribe

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष सुरू झाला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे म्हटले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव तसेच अन्य नेत्यांनी या कारवाईवर टीका केली आहे. मात्र, काँग्रेसच्या एका नेत्याने अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याला आक्षेप घेत, ही कसली नैतिकता, असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा – Amol Mitkari : जरा आपला इतिहास पहावा…, अमोल मिटकरींनी किरण मानेंना सुनावले

- Advertisement -

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यावरूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केजरीवाल यांच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांना तत्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लालकृष्ण आडवाणी, कमलनाथ तसेच हेमंत सोरेन अशी विविध नेत्यांची उदाहरणे देत केजरीवाल यांनी तात्काळ आपले पद सोडावे, असे म्हटले आहे. राजकारण पूर्णपणे अनैतिक बनण्याचा पायंडा 11 वर्षांपूर्वी स्थापन झालेला पक्ष पाडत असून यामुळे भारतीय राजकारणाचे पतन होईल, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. केजरीवाल हे आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटातून जात आहेत. एक माणूस म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. काँग्रेस पक्षानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पण भारतीय राजकारणात नैतिकतेची जी नवी व्याख्या ते निर्माण करत आहेत, ती पाहून मला ही पोस्ट लिहावी लागत आहे. एक काळ असा होता, जेव्हा आडवाणी, माधवराव सिंधिया आणि कमलनाथ यांच्यासारख्या नेत्यांची नावे हवाला व्यापारी जैनच्या कथित डायरीमध्ये आली होती आणि त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झाला होता, तेव्हा त्यांनी नैतिकतेच्या कारणाने ताबडतोब आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेअपघातानंतर राजीनामा दिला होता, याचे स्मरण त्यांनी करून दिले आहे.

हेही वाचा – Amit Shah : …तर आपल्याला जय गुजरात घोषणा देण्याची सक्ती; अभिनेत्याची अजितदादा, उदयनराजेंबद्दलची पोस्ट व्हायरल

अलीकडे जेव्हा ते (केजरीवाल) इंडिया अगेन्स्ट करप्शनचा तमाशा संपूर्ण देशाला दाखवत होते, तेव्हा यूपीए सरकारमधील मंत्र्यांनी भ्रष्टाचाराच्या ‘क्षुल्लक’ आरोपांवरूनही आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. काही महिन्यांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अटकेपूर्वी राजीनामा देऊन नैतिक आचरणाचे दर्शन घडवले होते. हजारो वर्षे मागे गेलो तर रामाने आपल्या वडिलांच्या वचनासाठी राज्य सोडले होते. ज्याच्यासाठी सिंहासन हिरावून घेतले तो राजा रामचंद्राच्या गादीवर कधीच बसला नाही. उलट राम वनवासातून परत येईपर्यंत त्याने सिंहासनावर पादुका ठेवून कारभार केला, पण स्वत: त्या सिंहसानावर बसला नाही. भारताची अशी समृद्ध परंपरा आहे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील दारू धोरण घोटाळ्याचे सत्य काय आहे, हे न्यायालयाला ठरवायचे आहे, असे सांगून निरुपम म्हणाले की, मात्र या घोटाळ्याप्रकरणी एका मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे. ते कोठडीत असूनही मुख्यमंत्रीपदाला चिकटून आहेत? ही कसली नैतिकता आहे? त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा.

हेही वाचा – Sanjay Raut : केजरीवाल तुरुंगातूनही काम करू शकतात; संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -