नवी दिल्ली : नवीन वर्षात दिल्लीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याआधीच आरोप – प्रत्यारोपांवर सुरुवात झालेली दिसते आहे. या सगळ्या गोंधळातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. (arvind kejriwal writes to rss chief mohan bhagwat on new year asked answers to these questions bjps counter attack)
या विधानसभेच्या निवडणुकांची तयारी अत्यंत जोरात सुरू आहे. सध्या सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला अर्थात आपला पुन्हा एकदा विजय मिळवण्याची खात्री आहे. तर, भाजपा आणि कॉंग्रेस मात्र बऱ्याच काळानंतर सत्तेत परतण्याची वाट पाहात आहे.
निवडणुकीच्या या धुमशानीदरम्यान भाजप आणि आपमध्ये सातत्याने काही न काही जुंपलेली दिसते. या आरोप – प्रत्यारोपांमध्येच आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रा.स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. भाजपच्या चुकीच्या कामांना संघाचे समर्थन आहे का, अशी विचारणा केजरीवाल यांनी या पत्राद्वारे केली आहे. केजरीवालांच्या या पत्राला भाजपाने देखील उत्तर दिले आहे.
दिल्लीतील मतदारांची नावे मतदान यादीतून हटवण्याचा तसेच पैसे वाटल्याचा आरोप केजरीवाल यांनी भाजपावर केला आहे. मोहन भागवतांना लिहिलेल्या पत्रात केजरीवालांनी याचा उल्लेख केला आहे. भाजप करत असलेल्या या आणि अन्य अशाच चुकीच्या कामांना संघाचे समर्थन आहे का, अशी विचारणा केजरीवाल यांनी भागवतांना केली आहे. मते खरेदी करण्यासाठी भाजप नेत्यांकडून खुलेआम पैसे वाटले जाणे तसेच मतदार यादीतून मोठ्या संख्येने पूर्वेकडील आणि दलित मतदारांचे नाव काढून टाकणे, तुम्हाला मान्य आहे का, असेही या पत्रात म्हटले आहे.
भाजपाचे प्रत्युत्तर
दरम्यान, भाजपाने देखील केजरीवाल यांच्या या पत्राचे उत्तर दिले आहे. दिल्लीत कथितरित्या बेकायदेशीरपणे राहात असलेल्या बांगलादेशींना आप आणि केजरीवाल बनावट कागदपत्रे पुरवत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यासोबतच पैसे वाटून निवडणुकीत आपली व्होट बँक निर्माण करत असल्याचे देखील त्यांचे म्हणणे आहे. 70 आमदार असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.
दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, नवीन वर्षाचा पहिला दिवस हा सामान्यपणे संकल्प दिवस असतो. त्यामुळे मी आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात खोटं बोलणं बंद करणे, भ्रष्टाचार संपवणे, मुले, महिला तसेच ज्येष्ठांच्या नावाने खोटी वचने देणे बंद करणे आणि यमुना नदीच्या परिस्थितीबाबत माफी मागण्याचा आग्रह केला आहे.