नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषद संपल्याच्या काही मिनिटानंतर भारताने चीनला आव्हान दिले आहे. भारत आता लडाखच्या न्योमा येथे जगातील सर्वात मोठे हवाई तळ उभारणार असून, या हवाई तळाचे भूमीपुजन संरक्षण मंत्री राजनाथसिंह हे 12 सप्टेंबर रोजी करणार आहेत.(As soon as the G-20 meeting ends, India directly challenges China; Largest air base to be built in Ladakh)
एलएसीबाबत चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे नवीन एअरफील्ड बांधण्यासाठी एकूण 218 कोटी रुपये खर्च येणार आहे. सीमेवर चीनला कडवी टक्कर देण्यासाठी या एअरफील्डचे बांधकाम अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
जागतिक विश्वास निर्माण करण्याचा आत्मविश्वास
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्वीट करत म्हटले की, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत जागतिक पातळीवरील विश्वासाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि जागतिक विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ही परिषद आत्मविश्वास देणारी ठरली असल्याचे ते म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वगुरू आणि विश्व बंधू या दोन्ही रूपात भारताची ताकद यशस्वीपणे दाखवून दिली असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
हेही वाचा : G-20 शिखर परिषदेचे सूप वाजले; अध्यक्षपदाची सूत्रे ब्राझिलकडे सुपूर्द
दोन्ही देशांमध्ये तणाव सुरूच
पूर्व लडाखमधील न्योमा अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडचा वापर तीन वर्षांपूर्वीपासून केला जात आहे. चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान, सैन्य आणि साहित्य वाहतूक करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. 2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणाव कायम आहे.
हेही वाचा : भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान…, अक्षरधाम मंदिराच्या भेटीनंतर ऋषी सुनक यांच्या भावना
G-20 शिखर परिषदेचा समारोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जी-20 चे अध्यक्षपद ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवले. यादरम्यान त्यांनी सिल्वा यांना पारंपारिक गिव्हल दिला. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी नवीन जागतिक रचनेत जगाचे नवीन वास्तव प्रतिबिंबित करण्याचे आवाहन केले आणि संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली.