Asani Cyclone: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे उद्या वादळात रुपांतर; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा IMDचा इशारा

cyclone sitrang 7 killed in bangladesh heavy rain predict in many state

बंगालच्या उपसागरात आग्नेयला आणि अंदमानच्या समुद्राशी लागून असलेल्या दक्षिणेला भारतीय तटरक्षक दलाची जहाजे आणि विमाने, तसेच समुद्रातील खलाशी आणि मच्छिमारांना हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. कारण बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उद्या, 21 मार्चला चक्रीवादळात ‘असानी’मध्ये रुपांतरीत होऊ शकते, असे भारतीय हवामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आले आहे. यापूर्वी काल, शनिवारी बंगालच्या उपसागरातील वर्षातील पहिले असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदमान आणि निकोबार बेट प्रशासनाने मच्छिमारांसाठी एडवायजरी जारी करून 19 मार्च ते 22 मार्चपर्यंत समुद्रात न जाण्याची विनंती केली होती. अंदमान आणि निकोबार प्रशासनाने शनिवारी सकाळी ट्विट केले होते की, ‘असानी चक्रीवादळाच्या वेळेदरम्यान मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला जात आहे.’

भारतीय हवामान विभागाने म्हटले होते की, ‘बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र 20 मार्च सकाळी थोडे तीव्र होईल आणि 21 मार्चला ते चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटांकडे पुढे जात 22 मार्चला बांग्लादेश-उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीवर धडकू शकते.’

राष्ट्रीय हवामान अंदाज संस्थेने 17 मार्चला ट्विट केले आणि म्हटले की, ‘दक्षिण बंगालच्या उपसागरातील मध्यवर्ती भागावरील कमी दाबाचे क्षेत्र 20 मार्चच्या सकाळपर्यंत तीव्र दाबात आणि 21 मार्चला एका चक्रीवादळात रुपांतरित होऊ शकते. मग हे चक्रीवादळ उत्तर-ईशान्य दिशेने सरकून 22 मार्चला बांग्लादेश-उत्तर म्यानमारच्या किनाऱ्यावर पोहोचू शकते.’

या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदमान आणि निकोबार बेट प्रशासनाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहे. शुक्रवारी मुख्य सचिव जितेंद्र नारायण यांनी असानी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश स्तरावरील तयारीचा आढावा घेतला. सर्व अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.


हेही वाचा – Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज