देशभरात अशोक स्तंभावरून वाद , नेमके प्रकरण  काय ?

अशोक स्तंभावरील सिंह हिंसक दाखवले असून राष्ट्रीय चिन्हांचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे

देशात गेल्या काही दिवसांपासून नवीन संसदेच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक या अशोक स्तंभावरील सिंह हिंसक दाखवले असून राष्ट्रीय चिन्हांचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे. पण हा आरोप करण्यामागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेणेही आवश्यक आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसदेवर हा अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे. सारनाथमधील सम्राट अशोकाच्या स्तंभाची ही प्रतिकृती असून यात चार सिंह वेगवेगळ्या दिशेने पाहात आहेत. १२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या अशोक स्तंभाचे अनावरण करण्यात आले. पण या अशोक स्तंभावरील सिंह हे मूळ प्रतिकृतीमधील सिंहासारखे सौम्य दिसत नसून आक्रमक दिसत आहेत. असा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच संसद ही सरकारची नसते. यामुळे मोदींऐवजी लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते त्याचे अनावरण करायला हवे होते. असेही कॉंग्रेस, राजद नेते, तृणमूल कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यावर भाजपने स्पष्टीकरण दिले असून संसदेचे निर्माण कार्य सरकार करत असून काम पूर्ण झाल्यानंतर ते संसदेला हस्तांतरित करण्यात येणार आहे. असे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र तरीही विरोधकांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

सोशल मीडीयावर अशोक स्तंभावरून विरोधक पोस्ट लिहीत आहेत. काँग्रेसचे अधीर रंजन यांनी नवीन अशोक स्तंभावरील सिंह हे सारनाथाचे प्रतिक आहे की गीर जंगलातील सिंह असा सवाल केला आहे. तसेच या सिंहाच्या प्रतिकृतीमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे.

तर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी सारनाथाची प्रतिकृती असलेल्या अशोक स्तंभावरील सिंहाची मुद्रा बदलणे हा राष्ट्रीय चिन्हाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

राजदनेही या सिंहाच्या मुद्रेवरून टीका केली असून मूळ प्रतिकृतीच्या चेहऱ्यावरील सौम्य भाव आणि आता बनवण्यात आलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगत आहेत. आता तयार करण्यात आलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भाव आक्रमक असून संपूर्ण देशच गिळण्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. प्रत्येक चेहरा हा अंतर्मनातील विचार दर्शवतात असे  म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांनीही टि्वटवर जुना अशोक स्तंभाचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली त्यांनी म्हटल आहे की खरं बोलायचं तर गेल्या काही दिवसांपासूनचा सत्यमेव जयतेपासून सिंहमेव जयते असा संसर्ग आज पूर्ण झाला आहे. असे खोचक शब्दात त्यांनी भाजपला टोला हाणला आहे.

दरम्यान केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीप पुरी यांनी दोन्ही फोटो टि्वट केले आहेत. तसेच फोटोमधील बदल हे बघणाऱ्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांना यात जे बघायचे आहे त्यांना तसेच दिसणार असेही त्यांनी म्हटले आहे. सारनाथची मूळ प्रतिकृती ही १.६ मीटर एवढी आहे. तर संसदेवर उभारण्यात आलेल्या प्रतिकृती ही ६.५ मीटर आहे. पण जर हीच प्रतिकृती सारनाथच्या मूळ प्रतिकृतीच्या आकारात तयार केली तर ती हुबेहुब तशीच दिसेल. पण संसदेवरील अशोक स्तंभ ३३ मीटर उंचावर आहे. यामुळे ती मूळ प्रतिकृतीच्या आकारमानाची ठेवली तर ती दिसणारही नाही. यामुळे मोठी प्रतिकृती उभारण्यात आली आहे. पण जर खाली उभे राहून तुम्ही ती बघितली तर ती देखील सौम्य किंवा रागीट दिसू शकते असे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजपचे इंटरनेट मीडियाचे कार्यवाहक अमित मालवीय यांनी टीकाकार हे २ डी इमेजची तुलना विशालकाय ३ डी इमेज बरोबर करत असल्यानेच संभ्रमित झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान सध्या जरी अशोक स्तंभावरून हा वाद सुरू झाला असला तरी यास सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे. संसदेच्या निर्मितीस सुरुवात केल्यापासूनच  त्यास विरोध होत आहे. अनेकजणांनी सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करत संसद भवन आणि सेंट्रल विस्टाच्या उभारणी थांबवावी अशी मागणी केली होती. तसेच सरकार अनावश्यक खर्च करत असल्याचेही विरोधकांनी याचिकेत म्हटले होते. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

मराठमोळ्या शिल्पकाराने साकारला अशोक स्तंभ

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या सुनील देवरे या शिल्पकाराने अशोक स्तंभाची प्रतिकृती साकारली आहे. या स्तंभाची उंची 26 फूट असून रुंदी 11 फूट आणि 9500 किलो वजनाचा हा अशोक स्तंभ जयपूर येथे तयार झाला आहे.