Assam Flood : पुरामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत, ३१ जिल्हे पाण्याखाली, ६.८० लाख लोकांना पुराचा तडाखा

Assam Flood disrupt 31 districts and floods hit 6 80 lakh people

आसाममध्ये मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे आतापर्यंत 18 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर आसाममधील 31 जिल्हे पाण्याखाली गेल्यामुळे 6.80 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 93 हजार 562.40 हेक्टर शेत जमीन आणि 2 हजार 248 गावे पाण्याखाली आली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामसह बिहारमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. बिहारमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

आसाम आणि बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकारणी नौदल आणि बचाव पथकाकडून नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. पूरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. पुढील २४ ते ४८ तास देशाच्या उत्तर पूर्व भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

आसामधील नगाव, कचार आणि होजाईमध्ये सर्वाधिक पुराचा तडाखा बसला आहे. ASDMA ने दिलेल्या माहितीनुसार नगावमध्ये 3.39 लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. तर कचारमध्ये 1.77 लाख आणि होजाईमध्ये 70,233 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. लोकांच्या मदतीसाठी २१४ मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

गावे, शेतजमीन पाण्याखाली

कचार, होजई आणि नगावमध्ये आलेल्या पुरात गावे आणि शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. पाण्यात डुबून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भूस्खलनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. 93562.40 हेक्टेर शेतजमीन आणि 2,248 गावे सध्या पाण्याखाली गेली आहेत. पूरस्थितीमुळे ४ लाख जनावरे प्रभावित झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नौदलाकडून ११९ नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन

पूरस्थितीमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी नौदलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ११९ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना मदत आणि अन्न पाकिटे पुरवण्याचे काम नौदल करत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांना आश्वासन दिले की दिमा हासाओ जिल्ह्यातील जटिंगा आणि हरंगाजाओ दरम्यानच्या रस्त्यावरील वाहतूक एका आठवड्यात पूर्ववत केली जाईल.


हेही वाचा : जम्मू-काश्मीरमध्ये निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळून 10 जणांचा मृत्यू