दिल्ली विमानतळावर पवन खेरांना अटक, दिल्ली-रायपूर इंडिगो विमान रद्द

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावरून छत्तीसगडला जाण्यापासून रोखण्यात आले. यानंतर पक्षाच्या नेत्यांनी विमानतळावरच निदर्शनं केली. तसेच दिल्ली-रायपूर इंडिगो विमान रद्द करण्यात आले.

रायपूरमध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनात खेरा सहभागी होणार होते. या कारवाईच्या निषेधार्थ विमानात उपस्थित असलेले इतर काँग्रेस नेते भाजपविरोधात घोषणाबाजी करत विमानातून खाली उतरले. पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काँग्रेसने केला होता. पण नंतर ट्वीट करत पवन खेरा यांना अटक झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न विचारला असता खेरा म्हणाले की, दिल्ली पोलीस अधिकारी माझ्याकडे आले आणि म्हणाले की तुमचे सामान तपासायचे आहे. मी म्हटले की कोणतेही सामान नाही. तरीही ते म्हणाले, आमच्यासोबत चला, आता डीसीपी तुमच्याशी बोलतील. मी वाट पाहत राहिलो, डीसीपी आले नाहीत.

काही दिवसांपूर्वी पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर लखनऊमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांच्यावरील कारवाईला या प्रकरणाशी जोडले जात आहे. आसाम पोलीस वॉरंट घेऊन विमानतळावर पोहोचल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पवन खेरा यांच्या अटकेनंतर काँग्रेस नेते धरणे धरून बसले आहेत. त्याचवेळी दिल्लीहून रायपूरला जाणारे फ्लाइट 6E-204 देखील रद्द करण्यात आले आहे. अटकेनंतर पवन खेरा यांनी सांगितले की, ही लढाई मोठी असून मी संघर्ष करण्यास तयार आहे.


हेही वाचा : विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेला असतात तर… सर्वोच्च न्यायालयाने ठेवले नेमकेपणाने बोट