घरElection 2023Assembly Election : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा निवडणुकीत कोण मारणार विजयी...

Assembly Election : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा निवडणुकीत कोण मारणार विजयी चौकार?

Subscribe

भोपाळ : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील 675 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून रविवारी (3 डिसेंबर) चार राज्यांतील 635 जागांवरच मतमोजणी होणार आहे. फक्त मिझोरामच्या उमेदवारांबाबतचा निर्णय आता 4 डिसेंबरला होणार आहे. (Assembly Election Who will win in Rajasthan Madhya Pradesh Chhattisgarh Telangana elections)

राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागा आहेत, मात्र काँग्रेस उमेदवाराच्या मृत्यूनंतर केवळ 199 जागांवर मतदान झाले. एक्झिट पोलच्या निकालानुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी टक्कर आहे, तर राजस्थानमध्ये भाजपाचा वरचष्मा आहे. हिंदी राज्याच्या तीन राज्यांतील 519 जागांवर निर्णय घ्यायचा आहे. एक्झिट पोलनुसार, 119 विधानसभा मतदारसंघ असलेल्या तेलंगणामध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली आहे. रविवारी सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जातील. यानंतर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमवरून मतमोजणी सुरू होईल.

- Advertisement -

हेही वाचा – Rajasthan Assembly Elections : मतदार राजस्थानात परंपरा कायम ठेवणार? सर्वेक्षणानुसार भाजपाची सत्ता

 मध्य प्रदेशात कमलनाथ की शिवराज सिंह चौहान?

- Advertisement -

30 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपामध्ये जोरदार लढत होणार आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली होती. तेव्हा काँग्रेसला 40.89 टक्के मते मिळाली होती, तर भाजपाला 41 टक्के मते मिळाली होती. यावेळी भाजपाला माळवा आणि निमारमध्येही फायदा होऊ शकतो. शिवराज सिंह चौहान, नरोत्तम मिश्रा, कमलनाथ, जितू पटवारी, नरेंद्र सिंग तोमर, रीती पाठक, गणेश सिंग, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद सिंग पटेल, राकेश सिंग आणि फग्गन सिंग कुलस्ते या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मध्य प्रदेशातील कमलनाथ की शिवराज सिंह चौहान यांची सत्ता येणार हे पाहावे लागेल.

राजस्थानमधील 10 पैकी 7 एक्झिट पोलमध्ये भाजपा पुढे

200 सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत बहुमत मिळवणाऱ्या पक्षाला 101 चा जादुई आकडा गाठायचा आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील श्रीकरणपूर येथील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे 25 नोव्हेंबर रोजी 199 जागांवर मतदान झाले होते. दोन दशकांपासून राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्ची भाजपा आणि काँग्रेसभोवती फिरत आहे. यावेळी काँग्रेस नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, यावेळी परंपरा बदलेल आणि काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. मात्र भारतीय जनता पक्षाला विश्वास आहे की, परंपरा काय राहिल. दरम्यान, 25 नोव्हेंबर रोजी याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. राज्यात पहिल्यांदाच 75.45 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे लोकांच्या नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. राजस्थानमध्ये मतदान झाल्यानंतर दहा एजन्सींनी आपली एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली असून त्यात 10 पैकी 7 एक्झिट पोलमध्ये भाजपाला बहुमत मिळताना दिसत आहे.

हेही वाचा – Telangana Assembly Elections : काँग्रेस-बीआरएसमध्ये तेलंगणात होणार अटीतटीची लढत

 

छत्तीसगडमध्ये भाजपच्या जागा वाढतील?

छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांवर काँग्रेस आणि भाजपामध्ये लढत होत आहे. जवळपास 15 वर्षांनंतर 2018 मध्ये राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री चेहर्‍याशिवाय भाजपाने निवडणूक लढवली आहे, पण काँग्रेसचे पूर्ण नेतृत्व भूपेश बघेल यांच्याकडे आहे. भूपेश बघेल दुसऱ्यांदा काँग्रेसचे सरकार बनवण्यात यशस्वी ठरले तर त्यांनी छत्तीसगडमध्ये उंची वाढेल. निवडणुका जाहीर झाल्यापासून जनमत चाचण्यांमध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. मात्र मतदानानंतर निकालापूर्वी घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाही लढतीत असल्याचे दिसून आले. आदिवासी भागात बंपर मतदान झाल्यामुळे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना काँग्रेस छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन करेल, असा विश्वास आहे.

तेलंगणात केसीआरची हॅटट्रिक करणार की काँग्रेसचं सरकार येणार?

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत यावेळी कडवी लढत अपेक्षित आहे. के. चंद्रशेखर राव हॅट्ट्रिक करणार का याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत. ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस बीआरएसला कडवी टक्कर देताना दिसत आहे. केसीआर स्वतः कामरेड्डी आणि गजवेल या दोन विधानसभा जागांवरून निवडणूक लढवत आहेत. या दोन जागा यावेळी तेलंगणातील सर्वात हॉट जागा ठरल्या आहेत. गजवेलमध्ये भाजपाचे इटा राजेंद्र हेही रिंगणात आहेत. कामरेड्डी येथील रेवंत रेड्डी यावेळी केसीआरला आव्हान देत आहेत. भाजपाने विधानसभेच्या 119 जागांवर निवडणूक लढवत असून याठिकाणी 40 हून अधिक जागांसाठी तिरंगी लढत होत आहे. 25 नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये झालेले 70.60 टक्के मतदान हे सत्ता परिवर्तनाचे संकेत देताना दिसत आहेत. तसेच एक्झिट पोलमध्येही तेलंगणात काँग्रेस आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तसेच हैदराबादमध्ये सात जागा जिंकणाऱ्या एआयएआयएमचे भवितव्यही रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -