घरताज्या घडामोडीअटल बिहारी वाजपेयी जयंती; कवी मनाचा राजकारणी

अटल बिहारी वाजपेयी जयंती; कवी मनाचा राजकारणी

Subscribe

अटल बिहारी वाजपेयींनी राजकारणाच्या रणधुमाळीतही आपली चिंतनशिलता कवितेच्या माध्यमातून जिवंत ठेवली. कसा होता हा कविमनाचा राजकारणी याचा थोडक्यात आढावा...

आपल्या सर्वसमावेशक नेतृत्त्वाने प्रगती साधणारा पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. भारतीय राजकारणातलं न विसरता येणारं नाव आणि बुलंद व्यक्तीमत्त्व अटल बिहारी वाजपेयी यांचं होतं. आपल्या वाणीनं समोरच्याला मंत्रमुग्ध करणारा असा हा नेता. २५ डिसेंबर, १९२४ मध्ये जन्म झालेल्या वाजयपेयींनी आपली संपूर्ण कारकीर्द गाजवली. असा हा अवलिया फक्त राजकारणी नव्हता. तर अटल बिहारी वाजपेयी हे कवी मनाचे राजकारणी होते. त्यांनी राजकारणाच्या रणधुमाळीतही आपली चिंतनशीलता कवितेच्या माध्यमातून जिवंत ठेवली.

मेरी इक्यावन कविताएं

‘मेरी इक्यावन कविताएं’ हा वाजपेयींचा गाजलेला कवितासंग्रह. आणीबाणीत जेलमध्ये असतानाही वाजपेयींनी अनेक कविता लिहिल्या. जीवनातला प्रत्येक टप्पा पार करत असतानाही त्यांचं लक्ष कधीही हटलं नाही. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक अशी वाजपेयींची एक ओळख होती.

- Advertisement -

अटल बिहारी वाजपेयींचा जन्म ग्वाल्हेरमध्ये झाला. एका शिक्षकाच्या घरात २५ डिसेंबर १९२४ मध्ये वाजपेयींचा जन्म झाला. वडील कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आई कृष्णा देवींच्या या मुलाचं बालपण मध्यमवर्गीय वातावरणातच गेलं. वाजपेयी ग्वॉल्हेरच्या त्यावेळच्या व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये शिकले. आता हे लक्ष्मीबाई कॉलेज म्हणून ग्वाल्हेरमध्ये प्रसिद्ध आहे. पुढे कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून राज्यशास्त्र या विषयात त्यांनी आपलं एम. ए. पूर्ण केलं. आयुष्यभर अविवाहित राहिलेले वाजपेयी राजकारणात येण्यापूर्वी पत्रकार होते. त्यामुळं त्यांचा बऱ्याच विषयांवर अभ्यास होता.

एक मितभाषी कवी!

आपल्या अगाध अभ्यासाने सभा गाजवणारे वाजपेयी खऱ्या आयुष्यात मात्र मितभाषी होते. त्यांना कविता आणि संगीतामध्ये रमणं जास्त आवडायचं. आपल्या सभेतील भाषणांमध्येही त्यांनी आपल्या कवितांचा अगदी योग्य असा प्रयोग केला. इतकंच नाही तर त्यांना निसर्गाच्या सान्निध्यातही रमायला प्रचंड आवडायचे. राजकारणाच्या धावपळीतही शास्त्रीय संगीताच्या मैफिलीचं आयोजन वाजपेयी आपल्या घरी करत होते. भीमसेन जोशी त्यांचे आवडते गायक होते. पुण्यातल्या राजभवनावर भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असताना करण्यात आली होती.

- Advertisement -

बाधाएँ आती है आएँ, घिरे प्रलय की घोर घटाएँ
पाँवों के नीचे अंगारे, सिर परे बरसे यदीं ज्वालाएँ
निज हाथोंमें हसतें – हसतें, आग लगाकर जलना होगा
कदम मिलाकर चलना होगा

याच त्यांच्या स्वतःच्या कवितेप्रमाणेच त्यांनी पूर्ण आयुष्य जगलं. अकराव्या लोकसभेत वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते. विरोधी पक्षात असताना वाजपेयी सरकारला संसदेत आणि संसदेबाहेर धारेवर धरत. दुस-या लोकसभेपासून तेराव्या लोकसभेपर्यंत वाजपेयी खासदार होते. उत्तम संसदपटू अशी ओळख असलेले वाजपेयी थोडा वेळ संसदेबाहेरही होते. १९८४ मध्ये ग्वॉल्हेर मतदारसंघात वाजपेयींचा माधवराव शिंदेंनी पराभव केला होता. त्याकाळात संसदेच्या चर्चांदरम्यान वाजपेयींची अनुपस्थिती विशेष करून जाणवत असे. मात्र पुढे पुन्हा वाजपेयी संसदेत परतले आणि पंतप्रधानही झाले. हा त्यांचा राजकारणातील चढ-उतार पाहिल्यास, आपल्या कवितेप्रमाणेच त्यांनी आयुष्य जगल्याचं दिसून येईल. वास्तविक आपण जगत असलेल्या आयुष्यावरच त्यांनी कविता लिहिल्या असाव्यात. वाजपेयींच्या ‘गीत नहीं गाता हूँ’ या कवितेमधील,

लगी कुछ ऐसी नज़र,
बिखरा शीशे सा शहर,
अपनों के मेले में मीत नहीं पाता हूँ ।
गीत नहीं गाता हूँ ।

या ओळींनी त्यांच्या मनातील सर्व गोष्टी जणू काही कागदावर उमटवल्या आहेत. तर ‘आओ फिर से दिया जलाएँ’ या कवितेतून अटल बिहारी वाजपेयी यांची सकारात्मकता दिसून येते.

हम पडाव को समझे मंझिल
लक्ष्य हुआ आँखो से ओझल
वर्तमान के मोहजाल मे
आनेवाला कल न भुलाए
आओ फिरसे दिया जलाएँ

यामधून भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला नवी दिशा देत होती. तर थबकलेल्यांना जणू त्यांची कविता इशाराच देत होती असं म्हणावं लागेल. वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. वाजपेयींचा चेहरा अनेकांना त्यावेळी डाचत होता. पण वाजपेयी दबावाला कधीच बळी पडले नाहीत. ते नेहमीप्रमाणेच शांत राहिले. त्यांच्या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणेच, ‘मैं खामोश हूं बीमार नहीं, डर अपनों से है परायों से नहीं’ याप्रमाणेच ते नेहमी जगत राहिले. आपल्या कृतीतून त्यांनी विरोधकांना नेहमीच शांत केलं. ‘काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ’ ही फक्त वाजपेयींची कविताच नाही तर तो जगण्याचा श्वासही ठरला.

बोलने के लिए वाणी चाहिए
चुप रहने के लिए वाणी और विवेक दोनों चाहिए
लोग बोलकर भी हार गए
मैं खामोश रहकर भी जीत गया

याच ओळी आजही अगदी तंतोतंत वाजपेयींच्या आयुष्याला लागू होताना दिसत आहेत. असा हा कवीमनाचा राजकारणी फक्त राजकारणातच नाही, तर सामान्य आयुष्यातही लोकांना जिंकून गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -