बिहार: नाव बदलाचे राजकारण दिल्लीतून सुरू झाले आणि आता पाटण्यापर्यंत पोहोचले आहे. बिहार सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेल्या ‘अटल पार्क’ या उद्यानाचे नाव बदलून ‘कोकोनट पार्क’ असे ठेवले आहे. यावर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला असून याला अटलबिहारी वाजपेयींबद्दल अनादर करणारी वृत्ती असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी केंद्र सरकारने दिल्लीतील नेहरू स्मारकाचे नाव बदलून पंतप्रधान पार्क असं केलं होतं. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला होता. जनता दल युनायटेड आणि राष्ट्रीय जनता दल या काँग्रेसच्या ‘इंडिया’ नावाच्या आघाडीतील मित्रपक्षांच्या सरकारने अटल पार्कचे नाव बदलले आहे. यावरून हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे. (Atal Park First Nehru now Atal bihari Vajpeyee Targeted politics of name change)
बिहार सरकारमधील वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांनी आज सोमवारी अटल पार्कचे नाव बदलून कोकोनट पार्क केले. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी या पार्कचे नाव कोकोनट पार्क असे होते, 2018 मध्ये त्याचे नाव बदलून अटल पार्क करण्यात आलं होतं.
16 ऑगस्ट रोजी तेज प्रताप यादव यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांना आदरांजली वाहिली होती, परंतु आठवडाभरातच त्यांनी अटल पार्कचे नाव बदलले. यामुळे बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे.
शो ऑफ ट्रिब्युट आणि रिअॅलिटी यात फरक
भारतीय जनता पक्षाचे नेते जयराम विप्लव यांनी म्हटलं की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहिली होती. तेव्हा त्यांनी याला माजी पंतप्रधानांचा सन्मान म्हटले होते. अटलजी त्यांना किती आदर द्यायचे हेही त्यांनी सांगितले होते. मात्र आता त्यांच्याच सरकारमधील एका मंत्र्याने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेल्या उद्यानाचे नाव बदलले आहे. हा अटलबिहारी वाजपेयींचा थेट अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बिहारची जनता हे कधीही मान्य करणार नाही. नितीशकुमार यांनीही नाव बदलाबाबत त्यांची खरी भूमिका काय आहे हे सांगायला हवं, असंही म्हटलं जात आहे.
(हेही वाचा: Chandrayaan-3: चांद्रयान 3 च्या लँडर मॉड्यूलचं चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरने केलं स्वागत, इस्रोने दिली नवी अपडेट )