Atiq Ashraf Murder : अतिक-अशरफला 13 गोळ्या लागल्या, पण…; डॉक्टरांचा नवीन खुलासा

atiq-ahmeds-killers

नवी दिल्ली : माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी डॉक्टरांनी आता नवीन खुलासा केला आहे. अतिक आणि अशरफला 13 गोळ्या लागल्या, पण त्यांचा मृत्यू पहिल्याच गोळीत झाला होता.

उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कॅल्विन रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना रुग्णालयाच्या बाहेर मीडिया प्रतिनिधी बनून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. लवलेश तिवारी, शनी आणि अरुण मौर्य या तीन हल्लेखोरांनी पोलिसांनी पकडले असून एसआयटीने गोळीबार करणाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता या घटनेशी संबंधित इतर लोकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाशी संबंधित इतर दोन पोलिसांना नोटीस पाठवली असून त्यांना उत्तर देण्यासाठी बोलावले आहे.

पहिल्या गोळीतच अतिक-अशरफचा मृत्यू
अतिक अहमद आणि अशरफ यांना एकूण 13 गोळ्या लागल्या. यामध्ये अतिकला आठ तर, अश्रफला पाच गोळ्या लागल्या आहेत. अतिकच्या डोक्याच्या मध्यभागी तर अशरफच्या कपाळाजवळ गोळी लागली. यानंतरही गोळ्या झाडल्या गेल्या मात्र पहिली गोळी दोघांसाठी जीवघेणी ठरली. यामुळे गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

बॅलिस्टिक अहवालाची प्रतीक्षा
एसआयटीने स्टेटमेंट नोंदवले असून सध्या वैज्ञानिक पुराव्यांच्या मदतीने तपास पुढे सुरू आहे. सीन रिक्रिएशनचा फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता बॅलेस्टिक आणि इतर तपास अहवालांची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली होणार आहे.

पाच पोलीस निलंबित
माफिया अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची १५ एप्रिल रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर या दोघांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्यामुळे शहागंज पोलीस ठाण्याच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली असून त्यांना  निलंबित करण्यात आले आहे. कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये शहागंज एसओ अश्वनी कुमार सिंह यांच्याशिवाय दोन उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांचा समावेश आहे.