Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशAAP VS BJP : भाजपाच्या महिला समृद्धी योजनेवर माजी मुख्यमंत्र्यांची टीका, थेट मोदींवर साधला निशाणा

AAP VS BJP : भाजपाच्या महिला समृद्धी योजनेवर माजी मुख्यमंत्र्यांची टीका, थेट मोदींवर साधला निशाणा

Subscribe

आज (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिला समृद्धी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. मात्र भाजपाच्या महिला समृद्धी योजनेवर माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी टिका केली आहे.

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपाची सत्ता आली आणि रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज (8 मार्च) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिला समृद्धी योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे पात्र महिलांना दरमहा 2500 रुपये मिळतील. तसेच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. मात्र भाजपाच्या महिला समृद्धी योजनेवर माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी टिका केली आहे. महिला समृद्धी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची हमी नसून ती फक्त एक घोषणा असल्याचे सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Atishi Marlena targets Narendra Modi while criticizing BJP Mahila Samriddhi Yojana)

महिला समृद्धी योजनेची घोषणा झाल्यानंतर आतिशी मार्लेना यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील महिलांना वचन दिले होते की, 8 मार्च रोजी म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनी दिल्लीतील प्रत्येक महिलेच्या खात्यात 2500 रुपये जमा केले जातील. त्यांनी दिल्लीतील महिलांना त्यांचे बँक खाते त्यांच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून 8 तारखेला बॅंक खात्यात 2500 रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळेल. आज 8 मार्च आहे. दिल्लीतील महिला 2500 रुपयांची वाट पाहत आहेत. त्याच्या मोबाइलवर पैसे आल्याचा मेसेज कधी येईल? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Rahul Gandhi : ‘10,15,20,30 जणांना हकलायची वेळ आली, तर हकलून द्या”; राहुल गांधी संतापले

मोदींही हमी नसून फक्त घोषणा

आतिशी मार्लेना म्हणाल्या की, आज दिल्लीतील भाजपा सरकारने हे सिद्ध केले आहे की, महिला समृद्धी योजना ही मोदींची हमी नसून फक्त एक घोषणा होती. कारण आज 8 मार्च रोजी दिल्लीतील महिलांच्या खात्यात 2500 रुपये आले नाहीत. त्यांना महिला समृद्धी योजना मिळाली नाही. या योजनेत नोंदणी करण्यासाठी महिलांना पोर्टलही सापडले नाही. दिल्लीच्या महिलांना आज काय मिळाले? असा प्रश्न उपस्थित करत आतिशी मार्लेना म्हणाल्या की, महिला समृद्धी योजनेसाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. पंतप्रधान मोदींची ही हमी होती का? खरं तर आज दिल्लीतील महिलांचीही फसवणूक झाली आहे, असा थेट आरोप आतिशी मार्लेना यांनी केला.

महिला समृद्धी योजनेला मंजुरी 

राष्ट्रीय राजधानीतील महिलांना दरमहा 2500 रुपयांची रोख मदत देण्यासाठी भाजपा सरकारने महिला समृद्धी योजनेला आज (8 मार्च) मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी यासंदर्भात आज घोषणा केली. महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिल्ली अर्थसंकल्पात 5100 कोटी रुपयांच्या वाटपालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच एक पोर्टल देखील सुरू केले जाईल, अशी माहितीही रेखा गुप्ता यांनी दिली.

हेही वाचा – Mohammed Shami : रोजा न ठेवल्यामुळे शमी गुन्हेगार; जावेद अख्तर यांनी ट्रोलर्संना सुनावले