Leader of Opposition in Delhi : नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांची दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. रविवारी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल, आतिशी, गोपाल राय यांच्यासोबतच पक्षाचे अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते. तसेच आपचे सर्व नवनिर्वाचित आमदार देखील या बैठकीला उपस्थित होते. आतिशी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याने दिल्ली विधानसभेत सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेतेपदी महिलाच असणार आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी गुरुवारी शपथ घेतली. सोमवारपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. (atishi will be the leader of opposition in delhi assembly will challenge cm rekha)
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गोपाल राय यांनी आतिशी या विरोधी पक्षनेता असतील हे जाहीर केले. सर्व आमदारांनी त्यांची निवड केल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्ली विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. गोपाल राय म्हणाले की, आतापर्यंत आपने जी कामे केली आहेत, ती पूर्ण करणे, त्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच भाजपने निवडणुकीत जी आश्वासने दिली आहेत, ती त्यांच्याकडून पूर्ण करून घेणे, ही देखील विरोधी पक्षनेता म्हणून आमची जबाबदारी आहे.
हेही वाचा – IND vs PAK : भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले पाकिस्तानचे फलंदाज, वाचा सविस्तर
विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाल्यानंतर आतिशी म्हणाल्या की, दिल्लीतील जनतेने आम आदमी पक्षाला विरोधी पक्षनेत्याची भूमिका दिली आहे. मजबूत विरोधी पक्ष काय असतो, तो कसं काम करतो, हे आम्ही दाखवून देऊ. महिला दिनी महिलांना 2500 रुपये मिळणार, असे भाजपने सांगितले होते. हे वचन पूर्ण करून घेणे हे आमचं पहिलं कर्तव्य असणार आहे.
24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नवीन विधानसभेचे पहिल्या अधिवेशनास सुरुवात होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांना हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंह लवली शपथ देतील. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या सूचनेनुसार, लवली यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची देखील निवडणूक करण्यात येईल. 27 फेब्रुवारीला हे अधिवेशन संपेल. 24 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. भाजपाने यासाठी तीनवेळा आमदार आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या विजेंद्र गुप्ता यांची निवड केली आहे.
हेही वाचा – Bombay HC : चार दिवस सोबत राहिले, मुलीला परिणामांची कल्पना, आरोपीला जामीन देताना काय म्हणाले न्यायालय